पश्चिम महाराष्ट्रात चर्चेला ऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

लोकसभा निवडणुकीत भल्याभल्यांना घाम फोडणारे गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत आमदारकीसाठी अखेर भाजपची वाट धरली आहे. भाजपवर मनसोक्त तोंडसुख घेणाऱ्या पडळकर यांना भाजपने झाले गेले विसरून पावन करून घेतले आहे. खासदारकी मिळाली नाही, पण आमदारकी मिळते का, याचीच उत्सुकता त्यांच्या समर्थकांना आहे.

धनगर समाजातील तरुणांचा ‘आयडॉल’ अशी पडळकर यांची प्रतिमा तयार झाली होती. समाजाच्या भावनांना तिलांजली देत ते वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडले आणि आमदारकीसाठी भाजपची वाट धरली, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. लोकसभेच्या रणांगणात त्यांना उतरविण्यात भाजपचाच हात होता का, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात एकास एक लढत झाली तर भाजप अडचणीत येऊ शकेल, यातूनच ही लढत तिरंगी करण्याचे प्रयत्न झाले.

एके काळी राष्ट्रीय समाज पक्षात कार्यरत असलेल्या पडळकरांनी राजकीय महत्त्वाकांक्षेतून भाजपमध्ये प्रवेश करीत वक्तृत्वाच्या जोरावर तरुणाईमध्ये लोकप्रिय झाले. त्यांच्या भाषणबाजीवर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘भाजपचे स्टार प्रचारक’ असा मान मिळवला; पण या बदल्यात पक्षाने त्यांना केवळ भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिले. विधान परिषदेचे सदस्यत्व मिळेल, गेला बाजार एखादे महामंडळ तर हाती लागेल असा आशावाद उराशी बाळगून त्यांनी गेल्या विधानसभेची खानापूर आटपाडीची उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र खासदारांचा दोस्ताना खानापुरात अडचणीचा ठरल्याने त्यांची डाळ शिजली नाही. यामुळे नाराज झालेल्या पडळकरांनी खासदारांशी उभा दावा मांडला होता. यातून भाजपवर तोंडसुख घेत विरोधकांची ताकद संघटित करीत धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी साधली आणि आपले राजकीय बस्तान बसविले.

गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात पारंपरिक शेंडगे गटाला शह देत त्यां एल्गार पुकारला होता. या वेळी भाजपच्या कमळाला मते देऊ नका, असे आवाहन करत त्यांनी बिरोबाची शपथ वदवून घेत आपली वाट वेगळी राहील याची शाश्वती हार्दकि पटेल यांच्या साक्षीने दिली होती. राज्यभर धनगर समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावर संघटित करीत उत्तम जानकरांच्या मदतीने ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या उपद्रवमूल्याच्या भांडवलावर कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, तर कधी स्वाभिमानी असा फेरा करीत अखेरच्या क्षणी नागपुरात जाऊन त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवली.

स्वत:ला वंचित असल्याचा दावा करणारे गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य आणि सभापती आहेत. मग हे सत्तेपासून वंचित कसे, असा प्रश्न सामान्यांना पडलाच नाही.

‘एकच छंद..’ : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गोपीचंद पडळकर नायक असलेला ‘धुमस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात नायिकेमागे नाचगाणी करीत फिरणारा नायक पडळकरांनी वठवला होता. निवडणुकीच्या रणांगणावर या चित्रपटातूनही प्रसिद्धीची स्टंटबाजी करण्यात येत होती, मात्र निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या कारणावरून त्यावर प्रतिबंध घातले. त्यानंतर तो चित्रपटही कुठे गेला हे आजतागायत कळले नाही. लोकसभा निवडणुकीवेळी ‘एकच छंद.. गोपीचंद’ अशी घोषणा होती. ती आता ‘एकच छंद.. सत्तानंद’ अशी करायला हवी, अशी टीका त्यांच्यावर सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopichand padalkar in bjp to get mla tickets zws
First published on: 28-09-2019 at 02:37 IST