निधनानंतर वर्षभर दुखवटा न पाळता भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने परळीत ‘गोपीनाथगड’ उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला. या निमित्त आयोजित जयंती कार्यक्रमास समर्थकांनी उन्मादी स्वरूप दिल्याने भाजपतील अनेक ज्येष्ठांच्या भुवया उंचावल्या आहेत. संत परंपरेतील गडांचा राजकीय अंगाने उपयोग करून घेण्याची पद्धत बीड जिल्ह्य़ात पूर्वीपासूनच होती. अगदी जातनिहाय गडांची ओळखही निर्माण व्हावी, असे वातावरण विविधपक्षीय नेत्यांनी निर्माण केले होते. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्य़ात पहिल्या राजकीय गडाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.  ‘गोपीनाथगडा’च्या उभारणीसही राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
मुंडे यांच्या मृत्यूनंतरचा त्यांचा पहिलाच जन्मदिन होता. मराठवाडय़ात मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली, तर भाजप सदस्य नोंदणी अभियानातही मुंडे यांचे मोठे छायाचित्र लावून नोंदणी करण्यात आली. मात्र, या ‘जयंती’च्या ‘उत्साहा’वर भाजपतीलच काही नेत्यांनी प्रश्नचिन्ह लावले असून, दुखवटय़ाचे
वर्ष असतानाही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ‘जयंती’ साजरी करण्याची आवश्यकता होती काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.  विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी नामनिर्देशित असलेले राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी तर हा सगळा प्रकार ‘उन्मादी’ असल्याची टीका शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. ‘एखाद्याच्या घरात मृत्यू झाल्यानंतर वर्षभर नवा कपडाही कोणी अंगावर घालत नाही. जयंतीचा उत्साह वर्षांच्या आत करणे चुकीचेच वाटते,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहेब मोठे होतेच. कर्तृत्वाने त्यांनी ते स्थान मिळविले होते. प्रतिकूल स्थितीत त्यांनी काम केले. मात्र, वर्षभर दुखवटा पाळायला हवा होता. असे कार्यक्रम करणे चुकीचे आहे. या कार्यक्रमातही माझ्यावर टीका करण्यात आली. ग्रामविकासमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका करण्याचे कोणतेही औचित्य नव्हते.
धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath munde gadh in beed
First published on: 13-12-2014 at 04:34 IST