गेल्या २५ वर्षांपासून शासकीय सेवेत असलेल्या अस्थायी शिक्षकांना नियमित करण्यात यावे, असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांचे निर्देश असतानाही मंत्रालयातील अधिकारी न्यायालय आणि मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शिक्षकांना वेठीस धरीत आहेत.
 संगीत विषयाशी संबंधित महाराष्ट्रातील तीन शासकीय संस्थांमध्ये एकूण आठ वाद्य शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी एक औरंगाबादला, दोन अमरावतीच्या शासकीय संस्थेत तर पाच नागपुरातील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत आहेत. नागपुरातील पाच शिक्षकांपैकी दोन नियमित तर तीन शिक्षकांवर गेल्या २५ वर्षांपासून टांगती तलवार आहे. त्यांना नियमित सेवा देऊन सर्व लाभ देण्यावर शासकीय आणि न्यायालयीन पातळीवर शिक्कामोर्तब झाले असतानाही मंत्रालयातील काही अधिकारी पैशांच्या हव्यासापोटी नियमितीकरणाच्या आड येत असल्याची माहिती हाती आली आहे.
औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या तीन ठिकाणच्या शासकीय संस्थांमध्ये संगीत शिकवले जाते. तबलावादक आणि संगीत सहायक अशी त्यांची पदनामे आहेत. नागपुरातील तिघांना अद्याप नियमित करण्यात आले नाही. त्यामध्ये संगीत सहायक प्रशांत शंकरराव पोपटकर, तबलावादक प्रभू वामनराव साठे आणि सतीश पंढरीनाथ कदम यांची १९८७ च्या जानेवारीमध्ये नियुक्ती करण्यात आली आणि चारच महिन्यात तत्कालीन संचालक तारा चौधरी यांनी त्या तिघांची नियुक्ती रद्दबादल करीत सेवा समाप्त केली. त्या काळात मानधनावर शिकविणाऱ्या शिक्षकांनी एक वर्षांपेक्षा जास्त सेवा दिल्यास त्यांना नियमित करण्याचा अध्यादेश निघाला होता. त्या पाश्र्वभूमीवर या तिघांच्याही सेवा तडकाफडकी समाप्त करण्यात आल्या होत्या. म्हणून तीनही संगीत शिक्षक न्यायालयात गेले. न्यायालयाने या तिघांच्या बाजूने निर्णय देत त्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन सर्व लाभ पोहोचविण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतरही तिघांना नियमित करण्यात आले नाही. न्यायालयीन आदेशानुसार एका वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीच्या दृष्टिकोणातून विचार करावा, असे नमूद केले आहे. शासनाने हंगामी अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत २००२ मध्ये शासन परिपत्रक जारी केले आहे.
प्रशांत पोपटकर यांनी त्यांची सेवा नियमित व्हावी म्हणून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांना यश न मिळाल्याने त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याकडे उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, अवर सचिव, उच्च शिक्षण संचालक, माजी सहसंचालक डॉ. अजित देशमुख, वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेच्या माजी संचालक तारा चौधरी, विद्यमान संचालक डॉ. जयराम खोब्रागडे आणि संगीत विभागाचे प्रमुख डॉ. अग्निहोत्री यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. डॉ. जयराम खोब्रागडे म्हणाले, पोपटकरांबद्दल सकारात्मक दृष्टिकोण ठेवून त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच त्यांच्या प्रस्तावावर निर्णय होईल, अशी आशा आहे.