शहरात दोन ठिकाणी छापे, ८ जणांना अटक

नगर : पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्यात आलेला सरकारी गहू व तांदळाचा सुमारे ८ लाख रुपये किमतीचा (एकूण  ४१८ गोण्या) अवैध साठा कोतवाली पोलिस व पुरवठा विभागाने शहरात दोन ठिकाणी छापे टाकून जप्त केला. या साठय़ासह ट्रक व टेम्पो अशी ६ वाहने असा एकूण ४० लाख ९९ हजार ३७५ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी १० जणांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील ८ जणांना अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार झाले आहेत.

त्यानुसार शहराच्या मार्केट यार्ड आवारातील गाळा क्रमांक ५९ मध्ये असलेल्या सोहम ट्रेडिंग कंपनीच्या गोदामावर छापा टाकून जप्त केलेल्या गुन्ह्यत सुरेश बबनराव रासकर, सागर अशोक नांगरे, आदिनाथ सुखदेव चव्हाण व भगवान हरिभाऊ  छत्तीसे या चार जणांना अटक करण्यात आली तर आसाराम रासकर व संग्राम रासकर हे दोघेही फरार आहेत.

इंडस्ट्रियल इस्टेटमधील नर्मदा फ्लोअर मिल व त्याच्या मागे असलेल्या गोदामात पोलिसांनी छापा टाकला. या गुन्ह्यमध्ये गणेश श्रीनिवास झंवर, जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप व संदीप कारभारी पागिरे या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

परराज्यातील स्वस्त धान्य दुकानांना सरकारने वितरीत केलेला गहू व तांदूळ तसेच करोना टाळेबंदीच्या काळात विविध योजनांमधून गरिबांसाठी वितरित करण्यात आलेला गहू व तांदूळ याचा अवैध साठा शहरात केल्याची तसेच हा गहू व तांदूळ बेकायदेशीररित्या पीठ तयार करून विकला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार, उपनिरीक्षक मनोज कचरे, पुरवठा निरीक्षक निशा पाईकवार, अन्नधान्य निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षक संतोष लोटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रासकर पिता—पुत्रांविरुद्ध यापूर्वीही कारवाई

पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आजच्या कारवाईत आरोपी असलेल्या रासकर पितापुत्राचे माळीवाडा भागात स्वस्त धान्य दुकान होते. सात महिन्यापूर्वी पुरवठा विभागाच्या पथकाने अचानक केलेल्या तपासणीत या दुकानातून धान्य वितरणामध्ये केलेला घोटाळा उघड झाला. त्यामुळे माळीवाडा भागातील त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा रासकर पिता—पुत्राने परराज्यातून आणलेला सरकारी धान्याचा साठा पकडण्यात आला.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government seizes rs 8 lakh worth illegal stock wheat rice ssh
First published on: 20-06-2021 at 00:32 IST