महाराष्ट्राच्या विविध भागांत सध्या ‘गुलाब’ चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवत आहे. या वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने पावसाने राज्यभरात रौद्ररूप धारण केलं आहे. मराठवाडा, विदर्भासह मुंबई, ठाणे आणि राज्यातील विविध भागांना पावसाने झोडपलेलं असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकरकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावेळी नाना पटोले यांनी आणखीही काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

“विदर्भात सर्वत्र फिरताना आम्ही परिस्थिती पाहिली आहे. मराठवाड्याचीही माहिती घेतली आहे. राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे, सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात सर्वत्र निर्माण झालेली ही परिस्थिती हे ओल्या दुष्काळाचे संकेत आहेत. हेच लक्षात घेता सरकारने तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी”, अशी मागणी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

“हे काँग्रेसचे लोक..मेले होते तुम्ही, उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये घेतलं म्हणून…”शिवसेना समर्थक आमदाराचं खळबळजनक वक्तव्य!

आशिष जयस्वालांच्या ‘त्या’ विधानावर बोलण्यास नकार

आशिष देशमुख प्रकरणाबाबत देखील यावेळी नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांच्या अहवालानुसार आशिष देशमुख प्रकरणात योग्य कारवाई केली जाईल. मात्र, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आशिष देशमुख यांच्या वक्तव्यासंदर्भात काही माहिती समोर आली आहे. आता प्रभारींच्या अहवालानंतर निर्णय होईल”, असं पटोले म्हणाले. मात्र, यावेळी पटोलेंनी आमदार आशिष जयस्वाल यांच्या काँग्रेसविषयीच्या वक्तव्यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.

आशिष देशमुख प्रकरण काय?

काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हे चक्क एका भाजपा उमेदवारासाठी मतं मागत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे, काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओ भाजपाचे भिष्णुर सर्कलचे जिल्हा परिषद उमेदवार नितीन धोटे यांच्यासाठी आशिष देशमुख मतं मागताना दिसून आले आहेत. त्याचप्रामणे, त्यापूर्वी दोन दिवस आधी ते पार्वती काळबांडे या भाजपा उमेदवाराच्या देखील प्रचारसभेत उपस्थित राहिल्याचं वृत्त समोर आलं होतं.

आशिष जयस्वालांचं खळबळजनक विधान

शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले असं आशिष जयस्वाल म्हणाले आहेत. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केलं आहे. “हे काँग्रेसचे लोक. मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेलं लोक जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हतं”, आशिष जयस्वाल यांनी म्हटलं होतं.