महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. करोना संकट गडद झाल्याची जाणीव काल (१९ मार्च) सायंकाळी आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली. करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भातील नियमावली आज जाहीर करण्यात आली.

राज्यात करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन राज्य सरकारने करोनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीही संख्या ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- करोना संकट गडद : पहिल्या लाटेचा विक्रम मोडला; महाराष्ट्रात रुग्णसंख्येचा उच्चांक

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी करोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थिती देखील ५० टक्के करण्यात आली आहे. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावलेला नसेल, तर प्रवेश देण्यात येऊ नये. लोकांकडून करोना नियमाचं पालन करवून घेण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ असेल, याची खातरजमा करून घ्यावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

मुंबईत मॉल्स प्रवेशासाठी करोना चाचणी सक्तीची

मुंबईत करोनाची मगरमिठी पुन्हा आवळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाली असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत. एकिकडे निर्बंध लागू केलेले असताना महापालिकेकडून चाचण्यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिकेनं आता गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे. मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी ग्राहकांच्या अँटिजेन चाचण्या केल्या जाणार आहेत. लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधणं खूप अवघड काम आहे. अशी व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं असणार आहे.