राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने ९ ते ११ मे दरम्यान धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गहू, ज्वारी, बाजरी, विविध डाळी, फळे, भाजीपाला, प्रक्रियायुक्त पदार्थ यांची शेतकरी, शेतकरीगट यांच्याकडून ग्राहकांना थेट विक्री केली जाणार आहे. स्वच्छ केलेला, निवडलेला माल ग्राहकांना योग्य पॅकिंगमध्ये मध्यस्थाशिवाय ३ दिवस विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. शेतातील माल स्वच्छ व व्यवस्थित पॅकिंग करून ग्राहकांना योग्य किमतीत मिळणार आहे. ज्वारी, गहू, बाजरी, सर्व प्रकारच्या डाळी, हरभरा, काबुली चना, तूर, मूग, उडीद आदींची सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत विक्री होणार आहे. गावोगावचे शेतकरी महोत्सवात सहभागी व्हावेत, यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांनी आपली नावे कृषी सहायक यांच्याकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी धान्य महोत्सवात १ कोटी २८ लाखांची उलाढाल झाली.
महापालिकेसमोरील टाऊन हॉल मदानावर हा महोत्सव भरणार आहे. महोत्सवात येणारे धान्य विश्वासाचे व रास्त दरात मिळणार आहे. ग्राहकांनी महोत्सवात सहभागी होऊन धान्य खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे व आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक सु. ल. बाविस्कर यांनी केले आहे.