कराड : जनतेसाठीच्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासह त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ हा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला उपक्रम राज्यात प्रथमच सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभही शंभूराज देसाई व सात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते समारंभपुर्वक संपन्न झाला आहे.
दौलतनगर- पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाडे, तहसीलदार अनंत गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शंभूराज देसाई म्हणाले, ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राज्यात प्रथमच आपल्या जिल्ह्यात राबविला जात आहे, तो यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने राबविला जाईल, राज्यासाठी तो आदर्शवत ठरेल असा विश्वास शंभूराजेंनी व्यक्त केला.
या उपक्रमात अधिकारी जनतेच्या अडीअडचणी त्यांच्या दारात जावून जाणून घेण्यात येतील. तरी जनतने आपले प्रश्न, तक्रारी किंवा शासकीय कामाबाबत अडचणी असल्यास त्या कागदपत्रांसह पालकमंत्री कार्यालयातील समन्वयकांकडे द्याव्यात. प्राप्त अर्ज व तक्रारींचा निपटारा जलगतीने पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात येईल. विविध शासकीय कार्यालयांना संबंधित कामाच्या पूर्ततेबाबत सूचना दिल्या जातील. एखादे काम होण्यामध्ये काही अडचणी असल्यास त्यातून मार्ग काढला जाईल. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबनिहाय केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभही मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही शंभूराजेंनी दिली.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तत्त्वांवर व विचारांवर आपले कार्य सुरू आहे. लोकांनी आपल्याला निवडून दिल्यानेच अन् त्यांच्या मतांमुळे आपणास आमदार, मंत्री होता आले. या जाणीवेतून पाटण मतदारसंघातील मतदारांबरोबर आपली पहिली बांधिलकी आहे, हे कधीही विसरता कामा नये. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी सर्वसामान्य माणसाबरोबरची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांनी आपली तत्त्वे कणखरपणे जपली. आपणही त्याच तत्वाने काम केले पाहिजे, या उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सेवाभावीवृत्ती जोपासावी असे आवाहन शंभूराज देसाई यांनी या वेळी केले.