शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी १८ खासदारांपैकी १२ खासदार आणि २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी विद्यमान ५५ आमदारांपैकी ४० आमदार आमच्यासोबत असल्याचंही नमूद केलं. तसेच आता शिवसेना पक्ष आमचा आहे म्हणत तो पुन्हा उभा करू, असं म्हटलं. ते मुंबईहून जळगावला परतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, “५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे येत आहेत. आता पार्टी कुणाची, तर आमची. ४ खासदारांना तर मी स्वतः भेटलो आहे. आमच्यासोबत २२ माजी आमदार देखील येणार आहेत. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे. आम्ही हा पक्ष उभा करू. ते वैभव परत प्राप्त करू. आम्ही ‘तमाम हिंदू बंधू, भगिणी आणि मातांनो’ हे बाळासाहेब शब्द पुन्हा महाराष्ट्रात घमवू. त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आहे.”

“ज्यांचा गैरसमज झाला होता त्या कार्यकर्त्यांनी आरोप करणं साहजिक आहे. आमची बाजू त्यांना माहिती होत नाही, तोपर्यंत ते आरोप करतील हे आम्हालाही माहिती होतं. मात्र, बाजू मांडल्यानंतर जळगावमधील वातावरण पहिल्यापेक्षा शांत झालं आहे. मला वाटतं आम्ही सत्तेसाठी बाहेर पडलेलो नाही. सत्ता सोडून बाहेर पडलो,” असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

“शिवसेना पक्ष संपणार अशी आम्हाला भीती वाटत होती”

“लोकं सरपंचपदाची खुर्ची सोडत नाही. आम्ही मंत्रीपदं सोडून बाहेर निघालो. १ नाही तर ८ मंत्री बाहेर पडले. याचा अर्थ आम्हाला आमचा शिवसेना पक्ष वाचवायचा आहे. शिवसेना पक्ष संपणार अशी आम्हाला भीती वाटत होती. तो शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी हा उठाव केला आहे,” असंही गुलाबराव पाटील यांनी नमूद केलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था म्हणणाऱ्या गुलाबरावांना राऊतांचं उत्तर, म्हणाले “ते काही दुधखुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संजय राऊतांनी मी दिलेल्या मताची किंमत ठेवावी”

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “मला संजय राऊत यांना उत्तर देण्याची गरज नाही. ते खासदार म्हणून बसलेत त्यात आमचंही एक मत आहे. त्यामुळे त्यांनी त्या मताची किंमत ठेवावी, एवढीच त्यांना विनंती राहणार आहे.” “मला मंत्रीपद तर मिळणारच आहे, ते साहजिक आहे. मला कोणतं खातं हवं यावर बोलायचं नाही. एकनाथ शिंदे जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी सांभाळेल,” असंही त्यांनी सांगितलं.