Gulabrao Patil Replied to Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार वेश बदलून गृहमंत्री अमित शाह यांना भेटायचे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. ही चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे आणि अमित शाह यांना भेटायचे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर आता शिंदे गटाकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. शिंदे गटाचे नेते, आमदार तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावरून संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील

“संजय राऊत हे वैयक्तिक पातळीवर जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांना अशाप्रकारे टीका करण्याचा अधिकार नाही. ते ज्यापद्धीने मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत, हे दुर्दैवी आहे. त्यांनी स्वत: याप्रकरणाची चौकशी करायला हवी. हवेत गोळ्या मारण्याचं काम संजय राऊतांनी करू नये, अशाप्रकारे आरोप करून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा – “मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे”, खासदार संजय राऊतांचा दावा

“तुम्हाला दाढी येत नाही म्हणून…”

“एकनाथ शिंदे जनतेचे मुख्यमंत्री आहेत, हे ठाकरे गटाला सहन होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. जेव्हा मांडायला मुद्दे नसतात, तेव्हा अशाप्रकारे टीका केली जाते. मुळात दाढीवाल्यांमुळेच आज शिवसेना वाढत आली आहे. संजय राऊतांना दाढी येत नाही, म्हणून त्यांनी दाढीवाल्यांचा अपमान करू नये”, असे प्रत्युत्तरही त्यांनी संजय राऊतांना दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. “माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याआधी वेश बदलून भेटत होते. एकनाथ शिंदे हे जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते. एकनाथ शिंदे हे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले असल्याची माहिती माझ्याकडे आहे. तेदेखील अमित शाह यांना भेटले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नाव बदलून आणि वेश बदलून गृहमंत्री अमित शाह यांना भेटतात. मात्र, त्यांना कोणीही विमानतळावर आडवत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेलं आहे. कारण तसं त्यांना विमानतळावरून सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी वापरलेले बोर्डींग तपासलं पाहिजे. तसेच त्यांच्याकडून हे ओळखपत्र जप्त केली पाहिजेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.