पुस्तकवेडय़ा आणि सकस साहित्याची जाण असणाऱ्या वाचकांचा रविवारचा दिवस मोठा झोकात जाणार आहे. कारण सकाळी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना भेटण्याची संधी असेल आणि सायंकाळी अमृता सुभाष यांच्या ‘एक उलट एक सुलट’ पुस्तकातील लेखांचे अभिवाचन होणार आहे.
गुलजार यांच्या प्रकट मुलाखतीची उत्सुकता जाणकारांमध्ये अगदी कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आहे. ‘मिर्झा गालिब’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सकाळी १० वाजता एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे. पुस्तकाचे अनुवादक अंबरीश मिश्र हे गुलजार यांची मुलाखत घेणार असून प्रकाशक अरुण शेवते उपस्थित राहणार आहेत. शहरात उर्दू साहित्यातील अनेक जाणकार आहेत. या भाषेची नजाकत आणि शायर मिर्झा गालिब यांचे गारुड देशभर आहे. मराठीतून गुलजार उलगडून दाखविणारे पत्रकार अंबरीश मिश्र आणि गुलजार यांचा या अनुषंगाने होणारा संवाद आनंदाची पर्वणी असेल. त्यामुळे या कार्यक्रमाला हजेरी लावायचीच, असे संदेश सामाजिक संकेतस्थळावरही दिले जात आहे.
सृजनशील अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अमृता सुभाष यांच्या ‘एक उलट एक सुलट’ या पुस्तकाचीही चर्चा आहे. काही निवडक लेखांचे अभिवाचन अमृता सुभाष व अभिनेत्री ज्योती सुभाष करणार आहेत. अक्षरधारा व राजहंस प्रकाशनच्या वतीने सायंकाळी साडेसहा वाजता अभिवाचनाचा कार्यक्रम देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulzar amruta subhash programme in aurangabad
First published on: 20-12-2014 at 01:54 IST