सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात व गोंदवले येथे गुरुपौर्णिमा विधिवत परंपरेने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरासह ठिकठिकाणी तालुक्यांमधून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, तसेच साताऱ्यातील गोडोली येथे साईबाबा मंदिर आनंदवाडी दत्त मंदिर, वाई येथील बापट दत्त मंदिर व स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
सातारा शहरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने फुलांच्या बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली. नाजूक चणीच्या मोठ्या गुलाबांना विशेष करून मागणी होती. येथील स्वराज मंगल कार्यालयामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुभक्ती गुरुवंदना शंखनाद महोत्सव, तसेच शस्त्र प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साताऱ्यातून दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी नारायणपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सातारा बस स्थानकाच्या वतीने गोंदवले-नारायणपूर, तसेच नरसोबाची वाडीला जाण्यासाठी विशेष वाहनांचे आयोजन करण्यात आले होते. गोडोली येथील साईबाबा मंदिरामध्ये साईचरणी भाविकांनी सेवा अर्पण केली. यानिमित्ताने विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सातारा शहरातील वेगवेगळ्या स्वामी समर्थ मठांमध्येसुद्धा गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. शाळा-विद्यालयांमध्ये गुरूप्रति आदरभाव व्यक्त करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गोंदवल्यात भाविकांची गर्दी
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र गोंदवले येथे हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. गुरुपौर्णिमेनिमित्त येथील चैतन्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पंचपदी भजन कार्यक्रमाला सुरुवात झाली. समाधी मंदिरात रुद्राभिषेक, रामपाठ, सद्गुरू लीलामृत पारायण, कीर्तन, सकाळी आठ वाजता ब्रह्मानंद कोटी येथून रामदासी भिक्षा निघाली होती. गर्दीचा विचार करून देवस्थान ट्रस्ट गोंदवले ग्रामपंचायत, दहिवडी पोलीस ठाणे यांनी पार्किंग व्यवस्था केली होती. सातारा-पंढरपूर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान, चैतन्य रुग्णालय व माउली रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.