रविवारी सायंकाळी गारांसह आलेल्या  अवकाळी पावसाने इचलकरंजी परिसराला झोडपून काढले.  सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणा वृक्ष उन्मळून पडले. तर सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. महावितरणने वारे वाहू लागताच नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा बंद करून आपल्या कार्यक्षमतेचे दर्शन पुन्हा एकदा घडवले. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा बंद केल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. सिध्दनेर्ली (ता.कागल) येथेही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
मे महिन्याच्या तप्त उन्हामुळे सर्वाचीच घालमेल होत आहे. उकाडय़ामुळे त्रस्त झाले असताना सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने इचलकरंजीकर सुखावले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा वाहू लागला. पाठोपाठ पाऊस कोसळू लागला. गारा गोळा करण्यासाठी भर पावसात मुले घराबाहेर धावली होती. तथापि जोरदार पावसाचा फटका बसल्याचेही चित्र आहे. इचलकरंजीत सुमारे २५ हून अधिक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे चित्र आहे. उत्तम चित्रमंदिर व नाईक्स हॉटेल येथे झाड कोसळून पडल्याने कर्नाटकहून येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.