मूत्रपिंड किंवा मुत्राशयामध्ये ४ मि.मी. आकाराचा छोटासा जरी खडा असला तरी त्या व्यक्तीला किती मरणयातना होतात, हे त्यालाच माहित असते. जर हाच दगड ४५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा अधिक असेल तर भीतीने डोळे विस्फारतात. मुत्राशयात एवढा मोठा दगड बाळगत जीवन जगणाऱ्या एका रुग्णाला या मरणयातनेतून डॉ. गणेश गायकवाड यांनी सुटका करून दिली.
येथील जुनागाव भागातील संतोष चंद्रकांत गायकवाड याला अनेक दिवसांपासून लघवी करताना भयंकर त्रास होता होता. त्याने आठ दिवसापूर्वी येथील शल्यचिकित्सक डॉ. गणेश गायकवाड यांच्याकडे तपासणी केली. त्यानंतर संतोषच्या पोटात ४५० ग्रॅम एवढा मोठा दगड असल्याचे निष्पन्न झाले.  दरम्यान, काल दुपारी संतोषवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दीड तास डॉ. गायकवाड यांनी आपले मदतनीस सुनील जाधव, विनोद महाजन, विठ्ठल काळे, विकास जाधव यांना सोबत घेऊन यशस्वी शस्त्रक्रिया केली.
यात बधिरीकरणाचे काम डॉ. सागर ठाकूर यांनी केले. मुत्राशयातून हा मोठा दगड काढण्यात आला. यांच्यासोबतच वाढत असलेला एक छोटा खडाही काढण्यात आला आहे. डॉ. गायकवाड यांनी या दगडाविषयी सांगितले की, ऑग्झलेट, फॉस्फेट आणि कॅल्शिअम कार्बोनेट या तीन प्रकारांपैकी हा दगड फॉस्फेट या प्रकारातील असून १८ वर्षांच्या रुग्णसेवेत त्यांनी पहिल्यादांच एवढा मोठा दगड शस्त्रक्रिया करून काढला.
दरम्यान, संतोषची प्रकृती ठणठणीत असून या त्रासातून मुक्ती मिळाल्याने तो आनंदी आहे.