scorecardresearch

राणांच्या खेळीने अमरावतीच्या राजकारणात नवी समीकरणे

गेल्या निवडणुकीत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या

राणा दाम्पत्याचे सोमवारी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले.

मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा प्रकरणात शिवसेनेला केलेले लक्ष्य, भाजपच्या वरिष्ठ वर्तूळात थेट प्रवेश यामुळे महापालिकेच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आता निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या आहेत. १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झालेली त्रिस्तरीय प्रभाग रचना कायम राहणार असल्याने वजनदार नगरसेवकांसह प्रस्थापित सुखावल्याचे चित्र असले, तरी अमरावतीत राणा दाम्पत्याच्या खेळीने उलथापालथ होण्याचे संकेत मिळाले आहेत.

गेल्या निवडणुकीत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. हा राणा दाम्पत्याच्या राजकारणासाठी मोठा धक्का होता. राणा दाम्पत्याने युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बरीच शक्ती खर्ची घातली होती. रवी राणा प्रतिनिधित्व करीत असलेल्या बडनेरा मतदारसंघातील बहुतांश भाग हा अमरावती महापालिकेच्या हद्दीत येतो. स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेताना युवा स्वाभिमान पक्षाने तब्बल ५६ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते, पण तीनच जागांवर त्यांना यश मिळू शकले. 

गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले डॉ. सुनील देशमुख हे आमदार होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपने सरस कामगिरी करीत भाजपची सदस्यसंख्या ४५ वर नेऊन पोहोचवली. काँग्रेस, राष्ट्रवादीचे दुबळेपण हे भाजपच्या पथ्यावर पडले होते. एमआयएमने काँग्रेसच्या गडाला काही ठिकाणी खिंडार पाडले होते; पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांनी शहरावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके हे नव्या दमाने राष्ट्रवादीचा झेंडा उंचावण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार असल्या, तरी जनाधारावर त्याचा फारसा परिणाम पडू न देण्याची काळजी घेताना ते दिसताहेत. भाजपला मात्र या वेळी सूर गवसलेला नाही. वेगवेगळय़ा गटांमध्ये विखुरलेल्या भाजपला महापालिकेची ही निवडणूक सहजसोपी नाही, हे बोलले जात आहे. एमआयएम, बसप यांसारखे पक्षही तयारीला लागले आहेत.

भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर खरी अडचण आहे, ती आमदार रवी राणा यांच्या वाढत्या हस्तक्षेपाची. खासदार नवनीत राणा यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा जाहीर करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तीत प्रवेश मिळवून घेतला, तर रवी राणांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधून भाजपमध्ये आपले स्थान मजबूत करून घेतले. आता तर नवनीत राणा या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक असतील, असे संकेत दिल्याने स्थानिक नेते अवाक् झाले आहेत.

अमरावतीच्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्या शक्यतेने भाजपमधील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. युती झाल्यास उमेदवारीसाठी संघर्ष अटळ मानला जात आहे.

रवी राणा यांच्या समर्थकांनी राजापेठ उड्डाणपुलावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्यानंतर घडलेल्या घडामोडी या राणा यांची प्रचारशैली, आगामी व्यूहरचना याचे संकेत देणाऱ्या होत्या. महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणात रवी राणांच्या विरोधात नोंदविण्यात आलेला गुन्हा, त्यानंतर राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे दिलेले आव्हान, अटक, सुटका या नवीन घडामोडींनी राणा दाम्पत्याने प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले खरे, पण त्याचा कितपत प्रभाव अमरावतीच्या रणांगणावर दिसून येईल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hanuman chalisa issue mp navneet rana mla ravi rana s target shiv sena zws

ताज्या बातम्या