Harshvardhan Sapkal remark on CM Devendra fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा काहीसा मागे पडला असताना ओबीसी समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सपकाळ यांनी केलेल्या या विधानावर भाजपकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आले आहे.
हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत २ सप्टेंबर रोजी शासनाने जारी केलेला जीआर (शासन निर्णय) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात ओबीसी समाजाचे आंदोलन होत आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील ओबीसी-मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आणि दोन्ही समाजातील तेढ यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदाहरण दिले होते. ज्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
भाजपाने जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे हर्षवर्धन सकपाळ म्हणाले आहेत. यादरम्यान पत्रकार परिषदेत त्यांनी विधान केलं की, “देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात. जसे नथूराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला, त्या शांत पद्धतीने देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहातात. या सर्वामध्ये त्यांनी हा खेळ खेळू नये आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, ही काँग्रेस पक्षाची मागणी आणि भूमिका आहे.”
भाजपाचे काँग्रेसला प्रत्युत्तर
दरम्यान या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचे म्हटले आहे. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवाभाऊंवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. हा हर्षवर्धन सपकाळ यांच्या नालायकपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे. एकाबाजूला महात्मा गांधींचं नाव घ्यायचे आणि नथुराम गोडसेबरोबर तुलना करायची याबद्दल सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे,” असे नवनाथ बन म्हणाले.