Sanjay Raut on MVA: विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढावे, असे शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून सांगितले जात आहे. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही “मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढवायच्या यावर वरिष्ठांशी बोलून ठरवू”, असे विधान केले होते. यामुळे महाविकास आघाडी फुटणार का? असा प्रश्न निर्माण झाला. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना आज माध्यमांनी सदर प्रश्न विचारला असता त्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली.

काँग्रेसला मिरच्या झोंबण्याचे कारण काय?

वर्षा गायकवाड यांच्या विधानाचा विरोध करताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पक्षातील विभागप्रमुख, जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेवेळी अनेकांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली. तीच आम्ही बोलून दाखवली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेसच्या नेत्यांनी आमचे विधान व्यवस्थित ऐकायला हवे. ऐकण्याचीही सवय लावली पाहीजे. दुसऱ्याचे ऐकणे ही एक मोठी गोष्ट असते. मी एवढेच म्हणालो की, लोकसभेसाठी इंडिया आघाडी आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडी बनवली होती. पण स्थानिक स्वराज संस्थेत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेणेकरून स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत होईल. यावर काँग्रेसला मिरची लागण्याचे कारण काय?

हे वाचा >> Varsha Gaikwad : “आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया

संजय राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना आता बुथ स्तरावर काम करण्याची गरज आहे. लोकसभेला साडे चार वर्षांचा कालावधी आहे. विधानसभेला पाच वर्ष आहेत. या काळात पक्ष संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले पाहीजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही भाजपामध्ये असताना…

इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी फुटली, असे शिवसेना (ठाकरे) पक्ष किंवा मी म्हटलेले नाही. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीबाबत आम्ही एक भूमिका मांडत आहोत. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती. स्थानिक स्वराज संस्थेसाठी ही आघाडी नव्हती. आम्ही भाजपामध्ये असतानाही स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढत होतो, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.