scorecardresearch

“बाबरी पाडली तेव्हा मी उपस्थित होतो”, फडणवीसांच्या वक्तव्यावर कारवाई होणार का? हसन मुश्रीफ म्हणाले…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मी तेथे उपस्थित होतो, असं वक्तव्य केलं. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलीय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मी तेथे उपस्थित होतो, असं वक्तव्य केलं. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची गृह विभाग सत्यता तपासेल. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कारवाई करायची की नाही याचा निर्णय घेईल, असं मत हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (२ मे) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

रविवारी (१ मे) मुंबई येथे झालेल्या बुस्टर डोस सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तेथे उपस्थित नव्हता. आमच्या ३२ नेत्यांवर गुन्हा दाखल झाला. मी स्वतः तिथे उपस्थित होतो.” याबाबत पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारला. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी नेमके काय विधान केले हे मला माहीत नाही. मात्र, गृह विभाग त्याची सत्यता तपासून कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेईल.”

“शरद पवार कोणाला घाबरणारे नाहीत आणि…”

हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, “गेली ६० वर्षे शरद पवार राजकारणात आहेत. राज्याचे राजकारण त्यांच्या भोवती फिरत राहते. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा अजेंडा राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी घेतला असावा. तथापि शरद पवार हे कोणाला घाबरणारे नाहीत आणि आपली विचारधारा ही बाजूला करणार नाही. या वयातही त्यांची कामाची झेप मोठी आहे.”

हेही वाचा : …तर किरीट सोमय्या यांची हत्तीवरून मिरवणूक काढू : हसन मुश्रीफ

“नोटबंदीप्रमाणे भोंग्याबाबत देशभर एकच धोरण असावे”

“शरद पवार यांना बदनाम केल्याशिवाय आपले काही चालणार नाही असे वाटत असल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे,” असा टोला मुश्रीफ यांनी राज ठाकरे यांना उद्देशून लगावला. नोटबंदीप्रमाणे भोंग्याबाबत देशभर एकच धोरण असावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे केली आहे, असंही मुश्रीफ यांनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hasan mushrif comment on devendra fadnavis babri remark and legal action in kolhapur pbs

ताज्या बातम्या