scorecardresearch

“अनिल देशमुखांवर १०९ वेळा छापेमारी, हसन मुश्रीफांविरोधात हा विक्रम ईडी आणि…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली याचं काही आश्चर्य वाटत नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे

What Supriya Sule Said?
सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधातल्या कारवाईबाबत काय म्हटलं आहे?

आजचा दिवस उगवला तोच कागलमध्ये झालेल्या हसन मुश्रीफ यांच्याविरोधातल्या ईडीच्या छापेमारीमुळे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. यानंतर आता या प्रकरणी सातत्याने टीका होताना दिसते आहे. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यापाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देत ईडी आणि सीबीआयला टोला लगावला आहे.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली याचं काही आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुखांच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने १०९ वेळा छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर छापेमारी करून ईडी आणि सीबीआयला हा विक्रम मोडायचा असावा ही शक्यता नाकारता येत नाही. हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी तिसऱ्यांदा गेली आहे तरीही पहिल्या दोन कारवायांमध्ये काय झालं? त्याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

सातत्याने विरोधकांच्या विरोधात यंत्रणा राबवल्या जात आहेत

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की विरोधकांच्या विरोधात केंद्र सरकारने सातत्याने यंत्रणा राबवण्यास सुरूवात केली आहे. संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सगळं सुरू आहे. हा प्रवास दडपशाहीच्या दिशेने सुरू आहे का? अशी शंका मला येऊ लागली आहे. आता ही शंका शंकेपुरतीच मर्यादित न राहता त्याच दिशेने केंद्र सरकार पावलं उचलत आहेत हे दिसून येतं आहे असंही सुप्रिया सुळेंनी मह्टलं आहे. अनिल देशमुख, संजय राऊत, एकनाथ खडसे, नवाब मलिक यांच्यावरही याच पद्धतीने अन्याय झाला आहे. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात झालेली ही कारवाई आता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्षात आणून देऊ असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. पहाटे ५ ते ६च्या दरम्यान ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या निवास्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात इडीच्या पथकाने छापा टाकला होता. त्या वेळी ‘ईडी’च्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती.

काय म्हटलं आहे जयंत पाटील यांनी?

ईडीने अशा प्रकारे पहाटे हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा धाड टाकली आहे ही बाब धक्कादायक आहे. कितीवेळा धाड टाकली जाणार आहे? मुंबई हायकोर्टाने याच प्रकरणांची सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने मतं व्यक्त केली की एजेन्सीजचा गैरवापर केला जातो आहे. लोकांच्याही या गोष्टी लक्षात आल्या आहेत ही मतं हायकोर्टाने व्यक्त केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे धाडसत्र राबवलं जातं हे आश्चर्यकारक आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अशा पद्धतीने भारतात कारवाया केल्या जाणार असतील तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. सत्ताधाऱ्यांना कुणी विरोधच करायचा नाही ही मानसिकता आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 13:10 IST