राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापा मारला आहे. गेल्या दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा ही धाड टाकली आहे. ईडीच्या या धाडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी ईडी आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आज ( ११ मार्च ) ईडीने पहाटे धाड टाकली. ईडीचे सात ते आठ अधिकारी पथकासह मुश्रीफांच्या घरी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तर, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने हसन मुश्रीफ मुंबईत असल्याचं सांगण्यात येत आहे. कागल येथील घरी मुले आणि कुटुंबातील महिला आणि नातवंडे असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : “अनिल देशमुखांवर १०९ वेळा छापेमारी, हसन मुश्रीफांविरोधात हा विक्रम ईडी आणि…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

ईडीने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. “समाजासाठी हसन मुश्रीफ एवढं काम करत आहेत. पण, असे असलं तरी ईडीकडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात. एकदाच आम्हाला गोळ्या घालून मारून टाका,” अशी संतप्त प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा : “भाजपात सगळे दुधाने धुतलेले…” मुश्रीफांवरील ईडीच्या कारवाईनंतर नाना पटोलेंची तिखट प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ईडीच्या धाडीनंतर कागलसह कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. धाडीची माहिती मिळताच मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक होत निवास्थानाबाहेर गोळा झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आणि कोल्हापूर पोलीस दलाचा मोठा फौजफाटा मुश्रीफ यांच्या निवास्थानाबाहेर तैनात करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या, ईडी, भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.