उमेदवारांच्या ‘आशीर्वाद भेटीं’ना हजारे समर्थकांचा आक्षेप

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवारांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची अहमहमिका लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवारांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची अहमहमिका लागली आहे. त्याला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाने तीव्र आक्षेप घेतला असून, वाल्याचे वाल्मीकी होऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार असतील तर हजारे यांचा अशा प्रत्येक उमेदवाराला आशीर्वादच असल्याचे संघटनेचे पदाधिकारी श्याम आसावा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, की प्रत्येक निवडणुकीतील बहुतांशी उमेदवारांना अचानक अण्णांची आठवण होते. त्यांचे आशीर्वाद घेण्याची गरज वाटते. एरवी हे उमेदवार अण्णांच्या देशहिताच्या कुठल्याही आंदोलनात कधीही सहभागी नसतात. तसेच अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या प्रश्नांशी या उमेदवारांना कुठलेही कर्तव्य नसते. ते संपूर्णत: अलिप्त असतात. ऐन निवडणुकीतच अशा उमेदवारांना अण्णांची आठवण होते. अण्णांची भेट घेऊन, फोटो काढून बातम्या छापून आणण्यासाठी खटाटोप केला जातो. परंतु आता जनता जागृत झालेली आहे. असे ढोंगी उमेदवार त्यामुळे जनतेस फसवू शकत नाहीत. अण्णांच्या जनहिताच्या लढयात कधीही नसलेले हे संधिसाधू आता अण्णांची भेट घेण्याकरिता मिनतवारी करताना दिसतात.
खरेतर अशा उमेदवारांनी अण्णा यांची भेट घेऊन फोटो आणि कथित आशीर्वादाच्या बातम्या छापून आणण्यासाठी खटाटोप निरर्थक आहे. त्याऐवजी ख-या अर्थाने लोकशाही रुजवण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन, नागरिकांची सनद, नापसंतीचे मत नोंदविण्याबाबत, अकार्यक्षम लोकप्रतिनिधीला परत बोलविण्याचा अधिकार, ग्रामविकास, व्यवस्था परिवर्तन यासाठी उमेदवार काय करणार आहेत, याची माहिती मतदारांना देणे गरजेचे आहे. हे उमेदवार अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या १७ मुद्दय़ांबाबतही सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हजारे यांची भूमिका स्पष्ट असून उमेदवार कुठल्याही पक्षाचा अथवा गटातटाचा पुरस्कार अण्णा करीत नाहीत. तर जो उमेदवार चारित्र्यसंपन्न आणि ख-या अर्थाने सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेल त्यास जनतेने निवडून द्यावे, असे अण्णांचे आवाहन आहे. ज्या मतदारसंघात मत देण्यायोग्य एकही उमेदवार नसेल तेथे नापसंतीचे मत नोंदवावे, परंतु राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येकाने मतदान अवश्य करावे, असे आवाहन अण्णांनी केले आहे याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे.
गांधींबद्दल नाराजी
काही उमेदवार हजारे यांना भेटण्याचे केवळ नाटक करून त्यांच्या पाठिंब्याचा आभास निर्माण करतात असा आरोप करताना या निवेदनात नगरमधील भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या भेटीबाबत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या भेटीबाबत गांधी यांनी वर्तमानपत्रांना खोटी माहिती देऊन अण्णांनी आपल्या कामाचे कौतुक केल्याचे सांगितले. हजारे यांच्या तोंडी ही वाक्ये टाकून त्यांनी गैरसमज पसरवल्यामुळेच हा खुलासा करावा लागला असेही या निवेदनात म्हटले आहे.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hazare supporters objection to the visits blessing of candidates

ताज्या बातम्या