दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी व्यापक दूरदृष्टी ठेवून येथे आणलेल्या व अलीकडच्या काळात मराठवाडा ग्रामीण बँकेतून महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रूपांतरित झालेल्या बँकेचे नांदेडस्थित मुख्य कार्यालय औरंगाबादला स्थलांतरित करण्याची किमया महाराष्ट्र बँकेतल्या उच्चपदस्थांनी अवघ्या चार दिवसांत साधली. शंकररावांचे पुत्र व जिल्हय़ाचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हय़ातल्या लोकप्रतिनिधींना थांगपत्ता लागू न देता ही मोहीम सोमवारी फत्ते झाली.
खासदार चव्हाण राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असताना, महाराष्ट्र बँक पुरस्कृत मराठवाडा ग्रामीण बँकेसह राज्यातील अन्य ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करून महाराष्ट्र ग्रामीण बँक २००९ मध्ये उदयास आली. या बँकेचे मुख्यालय नांदेडऐवजी औरंगाबादला करण्याचा घाट महाराष्ट्र बँकेच्या संचालक मंडळाने तेव्हाही घातला होता. पण चव्हाण यांनी त्यास विरोध केला. त्याच वेळी त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे धाव घेऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय आपल्या कर्मभूमीत (नांदेड) राहील, अशी व्यवस्था केली.
नंतरच्या काळात चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेले तरी त्यांच्या राजकीय दबदब्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय नांदेडमध्ये राहिले. मधल्या काळात या बँकेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी मगदूम यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी ग्रामीण बँकेचे मुख्यालय औरंगाबादी असले पाहिजे, अशी भूमिका घेतली होती.
त्यांच्यानंतरच्या अध्यक्षांच्या काळात त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली होती, पण त्याच वेळी एप्रिल २०१३ मध्ये हा प्रशासकीय घाट उघड झाल्याने संबंधितांत खळबळ उडाली होती. अशोक चव्हाण यांनी त्या बातमीची दखल घेऊन संबंधितांना बँकेचे मुख्यालय नांदेडहून हलवू नका, असे सांगितल्यामुळे स्थलांतराची प्रक्रिया स्थगित झाली. तथापि नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी नंतर या विषयाकडे डोळेझाक केली. चव्हाण आता लोकसभेवर गेले आहेत, पण केंद्रात काँग्रेसचे सरकार नाही. या परिस्थितीचा फायदा घेत उच्चपदस्थांनी गाजावाजा न करता महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय औरंगाबादला हलविण्याची अधिसूचना १७ जुलै रोजी जारी केली.
अशोक चव्हाण दोन दिवस आधीच येथून दिल्लीला गेले होते. त्यांना तसेच शेजारचे खासदार राजीव सातव किंवा लातूर-परभणीच्या खासदारांना थांगपत्ता लागू न देता ग्रामीण बँकेचे मुख्यालय औरंगाबादला हलविण्याची प्रक्रिया पुढच्या दोनच दिवसांत पूर्ण करून सोमवारी नव्या मुख्यालयाचे मगदूम यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकप्रतिनिधींना आमंत्रित न करता वरील कार्यक्रम पार पाडण्यात आल्याचे वृत्त येथे आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Headquarter of rural bank go to aurangabad
First published on: 22-07-2014 at 01:30 IST