महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. राजेश टोपे यांच्या आईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या ७४ वर्षाच्या होत्या. जवळपास दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. एकीकडे आईची काळजी घेणे आणि दुसरीकडे करोनाची लढाई लढणे अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून टोपे यांची सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. करोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. ती अजातशत्रू होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. राजेश टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.

‘आईला हृदयविकाराचा आणि मूत्रपिंडाचा आजार होता. एक वर्षाचा असताना तिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. रोज सकाळी तिची भेट घेतो. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा भेटतो. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे टोपे यांनी त्यांच्या आईची प्रकृती गंभीर झाली होती त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे करण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता राजेश टोपे कुटुंबीयांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health minister rajesh topes mother dies after a long illness scj
First published on: 01-08-2020 at 23:03 IST