साताऱ्यातील लक्ष्मी टेकडी परिसरात दारू दुकानावर विक्रीतून जोरदार हाणामारी झाली. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने घरात घुसून एका तरुणाला दमदाटी करत, बेदम मारहाण केल्याने नागरिक संतप्त झाले. यातून एका गटाने तुफान हल्ला चढवत परिसरातील वाहनांची तोडफोड केली. हाणामारी, तोडफोडीची घटनेने सदरबझारमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मोठ्या जमावाने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तेथे ठिय्या देत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास बेकायदेशीर दारू विक्री करणार्‍यांच्या एका टोळक्याने धुडगूस घातला. घरात घुसून या टोळक्याने एका तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात नागरिक भयभीत झाले. यातूनच टोळक्याने परिसरातील काही वाहनांची तोडफोड करत ती वाहने देखील पाडली.

हा सर्व प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता. तोपर्यंत सदरबझारमध्ये नागरिक जमा झाले.दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी या घटनेविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे गाठण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सर्वाधिक समावेश होता. रात्री शेकडोंचा जमाव शहर पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर पोलिसांची गडबड उडाली. अचानक जमाव आल्याने पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तोपर्यंत रस्त्यावर बघ्यांची गर्दी वाढल्याने पोलिसांनी तक्रार घेवून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. सातारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असून आदेशाचा भंग करून जमाव गोळा करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी पोलीस संबंधितांच्या शोधात आहेत.