रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यावधीची उलाढाल असलेला मच्छी व्यावसाय पुर्णत: ठप्प झाला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘मोंथा’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे मच्छी व्यावसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच हा व्यावसाय ठप्प झाल्याने मच्छीचे दर ही चांगलेच वधारले आहेत. यामुळे खवैय्ये देखील नाराज झाले आहेत.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. कोकणातील बहुतांश मासेमारी व्यावसाय ठप्प झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मुंबईच्या हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्या पर्यत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आणखीन काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. ‘मोंथा’ या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान चांगलेच बिघडले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्र देखील खवळलेला आहे. परिणामी, रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागांत मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस गेल्या काही दिवसा पासून हजेरी लावत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडणा-या या पावसाने भात शेती बरोबर इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने कोकणातील शेतकरी हवालदील झाला आहे. मात्र आता या पावसाचा फटका मच्छी व्यावसायाला देखील बसला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, जयगड, गुहागर, दापोली व राजापूर येथील मच्छीमारी व्यावसाय ठप्प झाला आहे. १ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या मच्छी व्यावसायाला पावसाने पुन्हा ब्रेक लावला आहे. यामुळे जिल्ह्यातील मच्छी व्यावसायातुन होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल पुर्णत: थांबली आहे.
गणपती उत्सवा नंतर तेजीत सुरु झालेला मच्छी व्यावसाय थांबल्याने मच्छी व्यावसायिकांना आपल्या मासेमारी बोटी बंदरातून नांगरुण ठेवाव्या लागल्या आहेत. मच्छीमारी थांबल्याने माशांचे बाजारातील दर ही गगणाला भिडले आहेत. ३०० ते ४०० रुपयांना मिळणारी सूरमई आता ८०० रुपयांच्या पुढे गेल्याने खवैय्ये चांगलेच नाराज झाले आहेत. तसेच पापलेट, हलवा, बांगडा, कोळंबी या सारख्या माशांच्या दराने ५०० रुपयांचा दर पार केल्याने खवैय्यांना आता आपल्या जिभेचे चोचले पुर्ण करणे अवघड झाले आहे. शेत पिकां पाठोपाठ आता या मच्छी व्यावसायाला पावसाचा फटका बसल्याने मच्छी व्यावसायिकांना कामगारांचे पगार काढणे व घर चालविणे देखील अवघड झाले आहे.
मच्छी व्यावसायाला या वादळामुळे मोठा आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. पावसाळ्यानंतर मासेमारीसाठी बोटी तयार करण्याचा खर्च ही अजून सुटलेला नाही. त्यात आम्ही आणखी आर्थिक संकटात सापडलो आहोत. वादळी पाऊस लवकरच जावून पुन्हा मच्छी व्यावसाय सुरु होण्याची आशा लागून राहिली आहे. हा पाऊस व वादळ जाण्याची वाट बघण्या शिवाय आमच्याकडे कोणताच पर्याय नाही. – शरिफ मजगांवकर, मच्छी व्यावसायीक, रत्नागिरी.
