अलिबाग – मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेण तालुक्यात विक्रमी ३०३ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. संध्याकाळी काही क्षणांच्या विश्रांतीनंतर पावसाने उग्ररूप धारण केले. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत होते. सखलभागात पाणी साचले होते. वृक्ष उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडत होत्या. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. रात्री अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती.

हेही वाचा – सांगली, कोल्हापूरची पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीचा विसर्ग दुप्पट

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत अलिबाग १८५ मिमी, पेण ३०३ मिमी, म्हसळा १८३ मिमी, माणगाव १५१ मिमी, उरण १२० मिमी, श्रीवर्धन १६६ मिमी, खालापूर ११३ मिमी, रोहा १३४ मिमी, पोलादपूर १२३ मिमी, मुरुड १९९ मिमी, सुधागड १३८ मिमी, तळा २०५ मिमी, पनवेल १२१ मिमी, महाड ९९ मिमी, कर्जत ७०. ६ मिमी तर माथेरान येथे १४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १ हजार ५० मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात सरासरी १ हजार ७०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण १६२ टक्के आहे. अतिवृष्टीमुळे उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरांची माती ढासळू लागली असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.