अहिल्यानगर: अतिवृष्टीने बाधित झालेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील नुकसानीचे महसूल, कृषी व जलसंधारण विभागाने दोन दिवसात पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे अहवाल सादर करा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केल्या आहेत. राज्य सरकारकडून आवश्यक मदत मिळवण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, असेही आश्वासन त्यांनी दिले.

सभापती राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, शिरपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. बाधित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध करावी. पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी, अशाही सूचना सभापती शिंदे यांनी प्रशासनास दिल्या. ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, आपत्तीमध्ये शासन ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. एकही शेतकरी किंवा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी आपण पाठपुरावा करू. ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना मदत करावी. प्रशासनाशी समन्वय ठेवावा व परिस्थितीशी सामना करावा, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील कर्जत, जामखेडसह पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या पाच तालुक्यात तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने ३८० गावातील तब्बल १ लाख ९ हजार १६१ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. याचा फटका १ लाख ५४ हजार ३०९ शेतकर्‍यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. या पावसाने आलेल्या पुरात तीनजण पाण्यात वाहून गेले तर १३७ जनावरे दगावली आहेत. १५३ घरांची पडझड झाली आहे.

सर्वाधिक नुकसान पाथर्डी, शेवगाव तालुक्यात झाले. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्याचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशीही संवाद साधला. दरम्यान मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्याच्या विविध भागाततील शेतीपिकांचेही मोठे नुकसान केले होते. त्याची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी आहे.