तब्बल महिनाभराच्या प्रदिर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्य़ात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून ३३ टक्के पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. कापूस, सोयाबीन व धानाच्या पेरण्यांना वेग आला आहे. आणखी तीन चार दिवस असाच पाऊस राहिला, तर शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.डी.एल.जाधव यांनी व्यक्त केला आहे.
दरवर्षी मृग नक्षत्रात ७ जूनपासून सुरू होणारा पाऊस यावर्षी प्रदिर्घ म्हणजे जवळपास सव्वा महिना लांबल्याने शेती व शेतकऱ्यांचे यंदा काही खरे नाही, असेच चित्र सर्वत्र होते. मात्र, सव्वा महिन्याच्या प्रदिर्घ विश्रांतीनंतर शनिवार १२ जुलैपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात का होईना हास्य फुलले आहे. शेतकरी शेतीची मशागत करून पावसाची प्रतीक्षा करत होता. ढगही आकाशात एकत्र येत होते. मात्र, पाऊस बरसत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता सतत वाढत होती. आज येईल उद्या येईल म्हणता म्हणता एक महिना झाला तरी पावसाचा कुठेच पत्ता नव्हता. अशातच रिमझीम पावसांच्या सरींना सुरुवात झाली आणि गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस सुरू असल्याने पेरण्यांना कधी नव्हे तेवढा वेग आलेला आहे. या जिल्ह्य़ात पेरणीचे क्षेत्र पावणे पाच लाख हेक्टर असून आतापर्यंत ३३ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सर्वाधिक ८१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ धानाची १३ हजार हेक्टर, सोयाबीन ११ हजार हेक्टर, तसेच ज्वारी, तूर, भाजीपाला व अन्य पिकांच्या पेरण्याही झालेल्या आहेत.
धानपट्टा असलेल्या मूल, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, नागभीड, पोंभूर्णा व गोंडपिंपरी या तालुक्यात चांगला पाऊस सुरू असल्याने धानपिकाच्या पेरणीला वेग आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी तीन ते चार दिवस असाच दमदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ाभरात शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.डी.एल.जाधव यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. गेल्या चोवीस तासात जिल्ह्य़ात सरासरी ५६.४३३ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. यात चंद्रपूर ६२.२, बल्लारपूर ४८.१, गोंडपिंपरी १८.८, पोंभूर्णा ४०, मूल ८१.६, सावली ७९, वरोरा ३८.४, भद्रावती ४४, चिमूर ११८, ब्रम्हपुरी २१, सिंदेवाही १८२.५, नागभीड ४८.२, राजुरा ४५.९, कोरपना ९.६ व जिवती ९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पात केवळ ३१.११ टक्के द.ल.घ.मी पाणी आहे. यात आसोलामेंढा ४१.६९ टक्के, घोडाझरी १२.०२, नलेश्वर ३४.२३, चारगाव १४.३५, अमलनाला २२.५४, पकडीगुड्डम १०.५१, डोंगरगाव १४.८३, दिना ३१.४५, इरई धरण ४१.८५ टक्के पाणी आहे.