कराड : महापुरातून सावरत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिम घाट भागात आज पुन्हा पावसाने थैमान घातले.  मुसळधार पावसामुळे या भागातील प्रमुख धरणांच्या साठय़ात मोठी वाढ झाली असून बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे ८ फुटांपर्यंत उघडले असून ७२ हजार ३९८ क्युसेक वेगाने जलविसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील या विसर्गामुळे या भागातील नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

कोयनेच्या पाणलोटात गेल्या ३४ तासांमध्ये १५५.३३ एकूण ६,२२१ मि.मी (वार्षिक सरासरीच्या १२४.४२ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. कोयनेच्या धरण क्षेत्रात रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा वाढतो आहे. त्यामुळे धरणातून होणारा जलविसर्ग तूर्तास कायम राहणार असून, पाऊस वाढल्यास कोयना धरणाचे ६ दरवाजे ८ फुटांवरून आणखी वर उचलण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर कोयना-कृष्णा नद्यांकाठी दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे महापुराच्या संकटातून सावरत असलेल्या सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त जनता पुन्हा हवालदिल झाली आहे.

१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात सध्या ९९.४९ टक्के (१०४.७२ टीएमसी) पाणीसाठा आहे. पाऊस अद्याप कोसळत असल्याने विसर्ग वाढवत जलसाठा नियंत्रणात आणावा लागणार आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील धोम, कण्हेर, तारळी, धोम-बलवकडी, उरमोडी, मोरणा, सांगलीतील वारणा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगेबरोबर अन्य नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.