नांदेड: नांदेड जिल्ह्यातील नद्या – नाले भरभरुन वाहत असल्याने अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान विष्णुपुरी धरणाचे नऊ दरवाज उघडण्यात आले आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जाहीर केला. विष्णुपुरी धरणाच्या पाणलोटात पुन्हा मुसळधार पाऊस पडत असल्याने नांदेड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. तातडीचे नसेल तर घराबाहेर पडू नका, असा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. दरम्यान रात्रीतून वीज पडून एकाचा तर नदीच्या पूरात वाहून गेल्याने दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.
अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने महाविद्यालय पातळीवर सुटी देण्याचे अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. शहरातील सखल भागातील नागरिकांनी उंच भागात स्थलांतरीत व्हावे, असे सांगण्यात आले आहे. निजामसागरचा विसर्ग २ लाख २० हजारवरुन कमी करण्यात आला आहे. मात्र, पोच्चमपाडचा विसर्ग पाच लाख ३० हजार प्रतिसेकंद करण्यात आल्याने पुढील दोन तीन तासात काहीसा दिलासा मिळू शकेल. सध्या पाऊस सुरू आहे. रात्री साडेतीनच्या सुमारास झालेल्या पावसाने मुखेड, कंधार, नायगाव या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांतून नागरिकांना सुरक्षित काढण्याच्या प्रयत्न सुरू होते. दरम्यान लेंढी नदीला पूर आल्याने नांदेड- हैदराबाद वाहतूक बंद करण्यात आली आहे.
शेलगाव येथे २०० जण अडकले असून त्यांना काढण्यासाठी लष्कराला बोलावण्यात आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आता पाणी ओसरू लागले असून परिस्थिती सुधारेल अशी शक्यता दिसत असल्याचे डॉ. राहुल कर्डिले म्हणाले. तेलंगणातील जलसंपदा विभागातील अधिकारीही सहकार्य करत असल्याने पोच्चमपाडमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. नांदेड शहरातील काही भागातून नागरिकांना स्थलांतरीत करावे लागणार आहे.गर्भवती महिला, वयोवृद्ध व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम तातडीने केले जाईल. पूर ओसरल्याने पंचनाम्यास गती दिली जाईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.