अहिल्यानगर: जिल्ह्यात काल, गुरुवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. नगर, शेवगाव व पाथर्डी या तीन तालुक्यांतील १७ मंडलात अतिवृष्टी झाली. जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या तुलनेत दक्षिण भागात चांगला पाऊस झाला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. जिल्ह्यातील धरणे भरले आहेत, मात्र लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस नव्हता. सुरुवातीच्या काळात पाणलोटात दमदार पाऊस झाला, त्यामुळे धरणे भरली गेली. मात्र, लाभक्षेत्रात कमी होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर काहीसा परिणाम झाला होता. मे व जून महिन्यात झालेल्या पावसावर पेरण्या झाल्या. मात्र, नंतर पावसाने ओढ दिली. आकाशात काळे ढग जमा होत होते. मात्र, पाऊस केवळ रिमझिम स्वरूपाचा होत होता, तोही तुरळक प्रमाणात. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती.

जिल्ह्यात ऑगस्टअखेर ७ लाख २१ हजार ४७९.८१ हेक्टर क्षेत्रावर (१००.७४ टक्के) पेरणी झाली आहे. सध्या पिके फुलोरा व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत. मूग व उडीद पिकाची ८० ते ८५ टक्के काढणी झाली आहे. बाजरी फुलोरा व पक्वतेच्या अवस्थेत आहे. कापूस पाते फुटण्याच्या व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनची वाढ शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा पिकांना आहे.

या पार्श्वभूमीवर काल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ऑगस्टअखेर जिल्ह्यात १३५.३ मिमी. पावसाची नोंद झाली. जून महिन्यात १०८.२ मिमी. पावसाची सरासरी नोंद होते. मात्र, यंदा केवळ ८०.२ मिमी. पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरी ९७.५ पावसाची नोंद होते, प्रत्यक्षात ६१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती.

काल अतिवृष्टी झालेली मंडले पुढील प्रमाणे- नागापूर ६६.८, जेऊर ६५.८, शेवगाव ७४.३, बोधेगाव ७९, चापडगाव ७९, ढोरजळगाव ६८, एरंडगाव ७०.८, दहिगावने ७०.८, मुंगी ७५.३, पाथर्डी ६९.३, माणिकदौंडी ६९.४, टाकळी ७१.५, कोरडगाव ७०.८, मिरी ६८.५, तिसगाव ६५.३, खरवंडी ७१.५ व अकोले ७०.८ मिमी. तालुकानिहाय झालेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- नगर ३३.३, पारनेर १३, श्रीगोंदे ११.१, कर्जत १२.४, जामखेड २८.२, शेवगाव ७१.८, पाथर्डी ६८.४, नेवासा ४६.४, राहुरी १३.६, संगमनेर ३.४, अकोले ०.४, कोपरगाव ३.६, श्रीरामपूर १२.२ व राहाता ६.