सातारा : सर्व ऋतूतील राज्याचे थंड हवेचे पर्यटन स्थळ पाचगणी, महाबळेश्वर पर्यटनस्थळी भर पावसात पर्यटकांची गर्दी झाली आहे. रविवार सकाळपासून संततधार पाऊस, सर्वत्र पसरलेले धुके आणि थंड हवेची मजा पर्यटक घेत आहेत. सध्या वेण्णालेकसह सर्व पॉईंट आणि मुख्य बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे.
शाळांना लागलेल्या सुट्ट्या संपत आल्याने नागरिकांनी महाबळेश्वरकडे आपली पावले वळवली आहेत. सध्या येथे दिवसभर आल्हाददायक वातावरण आणि सायंकाळपासून सकाळपर्यंत थोडीशी थंड हवेची अनुभूती आहे. या बदललेल्या वातावरणामुळं पर्यटक खूश आहेत.
महाबळेश्वरचे आकर्षण असलेल्या ऑर्थरसीट पॉईंटससह पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले श्रीक्षेत्र महाबळेश्वर, केट्स पॉईंट तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉईंट येथे सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत.
नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला तर चौपाटीचे स्वरूप आले असून पाणीपातळी घटली तरी नौकाविहाराचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. सोबतच गरमागरम कणीस, पावभाजी, पाणीपुरी, भेळ तर येथील चविष्ट स्ट्रॉबेरी विथ क्रीम, विविधरंगी आईस गोळासारख्या थंड पदार्थावर देखील पर्यटक ताव मारताना पाहावयास मिळत आहेत. अनेक हौशी पर्यटक वेण्णालेक परिसरात घोडेसवारीचा आनंद घेत आहेत. येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.
प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर खरेदीसाठी येथील मुख्य बाजारपेठेत पर्यटक गर्दी करत आहेत. येथील चणा, चिक्की, जामसोबतच प्रसिद्ध चप्पलची खरेदी पर्यटकांकडून केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून महाबळेश्वर येथे गर्दी आहे. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. आज पाऊस सुरू झाल्याने सायंकाळनंतर पर्यटकांनी आपल्या घराची वाट धरली.