नाशिक : शहराचे दोनवेळा पोलीस आयुक्त आणि तत्पुर्वी नाशिक ग्रामीण दलाच्या पोलीस अधीक्षकपदी कार्यरत राहिलेल्या हिमांशू रॉय यांची नाशिकमधील आयुक्तपदाची दुसरी ‘इनिंग’ वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त राहिली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा ते स्वत:च धडकपणे रस्त्यावर उतरायचे. तेव्हा त्यांची पिळदार शरीरयष्टी आणि आवाजातील करारीपणाचे दर्शन घडायचे. मात्र, पोलीस प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीने दलाचे संचलन करायचे, अधिकाऱ्यांना दिशादर्शन, मार्गदर्शन करायचे की रस्त्यावर उतरायचे, असा प्रश्न अनेक नाशिककरांना पडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी मुंबई येथे बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त धडकल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकीय, सामाजिक आणि पोलीस वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला. नाशिकचे माजी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जिल्ह्य़ात अनेक वर्ष काम केले. दुसऱ्यादा ते नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर त्यांची कार्यशैली वादग्रस्त राहिली. त्यांच्या कार्यकाळात भद्रकाली परिसरात दोन गटात धुमश्चक्री उडाली होती. वाहनांची जाळपोळ, तुफान दगडफेक यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. क्षणाचाही विलंब न करता रॉय हे पोलीस कुमक घेऊन थेट दंगलग्रस्त भागात शिरले. पोलीस जवानांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडून जमावाला पांगविले. हाती लाठी घेऊन जमावाला पिटाळण्यात रॉय आघाडीवर होते. असे काही घडले की, रॉय हे रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळायचे. त्यांच्या कामाची वेगळीच पध्दत होती. ती अनेकांना रुचली नाही. माजी उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. शुल्कवाढीच्या मुद्यावरून काही महाविद्यालयीन विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत होते.तेव्हा रॉय यांनी दिलेल्या सल्ल्याने विद्यार्थी चकीत झाले. नंतर हे आंदोलन भव्यदिव्य संकुल उभारणाऱ्या नेत्याच्या समर्थकांनी गुंडाळले. परंतु, समर्थकांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांच्या काळात अवैध धंदे, व्यवसाय राजरोसपणे सुरू राहिले. शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण होण्याचा हा काळ होता. सत्ताधारी राजकीय मंडळींनी पोलीस ठाण्यांवर आपला दबाव निर्माण केला. काही राजकीय नेते फरार गुन्हेगारांना थेट न्यायालयात हजर करायचे. यामुळे काही विशिष्ट गटाच्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांवर मर्यादा आल्या होत्या, अशी आठवण काही तत्कालीन कर्मचाऱ्यांनी कथन केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himanshu roy the second inning as a nashik commissioner was in controversy
First published on: 12-05-2018 at 03:47 IST