सातारा महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला असतानाच हिंदू जनजागृती समितीने काकोडकर यांनी समाजाची दिशाभूल करणाऱ्या डॉ. दाभोलकरांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार नाकारावा, अशी मागणी केली आहे. देशभक्त शास्त्रज्ञाला समाजाची दिशाभूल करणारे आणि भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे पुरस्कार मिळणे हा विचित्र विरोधाभासच आहे, असे समितीने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी पुण्यात हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी पत्रकार परिषद घेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारास विरोध दर्शवला. डॉ. काकोडकर यांचे कार्य आणि देशाप्रतीचे योगदान नक्कीच मोठे आहे. पण त्यांना भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे पुरस्कार मिळणे हा विरोधाभास आहे. डॉ. दाभोलकरांनी कधीच सामाजिक कार्य केले नाही. त्यांनी नेहमीच स्वत:च्या कुटुंबाची तुंबडी भरण्याचे काम केले, असे बेछूट आरोप समितीने केले. दाभोलकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार न स्वीकारुन डॉ. काकोडकर यांची प्रसिद्धी, देशाविषयी योगदान यात तसूभरही फरक पडणार नाही. याऊलट हा पुरस्कार स्वीकारल्यास एक शास्त्रज्ञ दाभोलकरांच्या गैरकारभाराचे आणि खोट्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचे समर्थन करत आहे, असा संदेश समाजात जाईल, असे गोखले यांनी सांगितले. त्यामुळे समस्त हिंदूंच्या भावनांचा आदर करत हा पुरस्कार नाकारावा, अशी मागणी समितीने केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu janajagruti samiti dr narendra dabholkar dr anil kakodkar satara municipal corporation award
First published on: 12-10-2018 at 14:20 IST