हिंगोली : औंढा नागनाथ पंचायत समितीअंतर्गत आणखी एक सेवानिवृत्ती वेतन मंजुरी आदेशाच्या माध्यमातून घोटाळा उघडकीस आला आहे. एका मृत्यू पावलेल्या शिक्षकाच्या पत्नीच्या नावे सेवानिवृत्ती मंजूर वेतन आदेशाच्या (पीपीओ) छायांकित प्रतीच्या आधारे १२ महिन्याचे सुमारे ४.५० लाखाची रक्कम देण्यात आल्याचा प्रकार छाननीअंती उघडकीस आला आहे. या प्रकरणाची आता लेखा विभागाने सखोल चौकशी सुरू केली असून, तूर्तास संबंधीत कुटुंबाचे निवृत्तीवेतन स्थगित ठेवण्यात आले आहे.

सेनगाव पंचायत समितीने उन्हाळ्यातील टँकरने पाणीपुरवठ्यापोटी कंत्राटदाराला तब्बल ३० लाखांची रक्कम जादा अदा केल्याचे अलीकडेच स्पष्ट झाले. संबंधित रक्कम कंत्राटदाराकडून वसुल करण्यात आली असून, यामध्ये सेनगाव पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे. या सोबतच सेनगाव पं. स. मध्ये कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ४३.७७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेचा ५३ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. तर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी करून १.५५ लाख रुपये उचलण्याचा प्रयत्न केला. या गैरव्यवहाराची प्रकरणे गाजत असतांना आता औंढा नागनाथ पंचायत समितीचा आणखी एक सेवानिवृत्ती वेतन मंजुरी आदेश (पेन्शन पेमेंट ऑर्डर) मध्ये नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये सेवानिवृती मंजूर वेतन आदेशाच्या छायांकित प्रतीवर मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीतील कुटुंब सेवानिवृत्तीवेतन अदा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे कळमनुरी पंचायत समितीकडून मूळ प्रतिवर सेवानिवृत्ती वेतन अदा होत असताना औंढा नागनाथ पं. स. ने छायांकित प्रतिवर सेवानिवृत्ती वेतन अदा केले. दरम्यान, संबंधित मृत शिक्षक प्रकाश कदम यांच्या सुवर्णमाला या शिक्षिका पत्नीच्या नावे दोन्ही पंचायत समितीकडून सेवानिवृत्ती वेतन जमा होत होती. हा प्रकार जून महिन्यात शिक्षण विभागाच्या छाननी दरम्यान लक्षात आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. आता हा प्रकार कोणाच्या संगनमताने करविला, हे प्राथमिक चौकशीअंती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी लेखा विभागाने चौकशी सुरू केली असून, संबंधित शिक्षकाचे कुटुंब निवृत्ती वेतन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छाननी दरम्यान प्रकार उघडकीस

औंढा नागनाथ पंचायत समितीच्या कपातीच्या रकमेची चौकशी नुकतीच संपली असतानाच हा प्रकार समोर आला. संबंधितांना पत्र दिले. त्यांचा खुलासा आल्यानंतर नियमान्वये योग्य ती कारवाई केली जाईल. तूर्त संबंधित शिक्षकांचे कुटुंब निवृत्ती वेतन तात्पुरते स्थगित केले आहे. – प्रशांत डिग्रसकर, शिक्षणाधिकारी.