हिंगोली : ‘फ्लिपकार्ट’ कंपनीच्या वस्तूचे टपाल घेऊन जाणाऱ्या मालमोटारीला अडवून सुमारे आठ लाखांचे साहित्य लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना पकडण्यात हिंगोलीच्या पोलिसांना यश आले. जिल्हा पोलीस अधीक्षकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले. या दरोड्यात ‘फ्लिपकार्ट’ कंपनीतील माजी व्यवस्थापकासह दोन चालकांनी हा कट रचल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. आरोपींकडून वाहनांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
वसमत तालुक्यातील भेंडेगाव पाटीजवळ ‘फ्लिपकार्ट’ कंपनीचे पार्सल घेऊन जाणाऱ्या मालमोटारीसमोर वाहन आडवे लावून दरोडेखोरांनी सात लाख ७७ हजारांचे सामान व दोन मोबाइल लुटले. ही घटना ११ जून रोजी पहाटे घडली. या घटनेत मालमोटार चालक, सहायकासही मारहाण झाली होती. याप्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दरोडेखोरांना पकडण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने दरोडेखोरांचा शोध सुरू केला.
तपासात हा दरोडा रिसोड तालुक्यातील ज्ञानेश्वर प्रकाश खानजोडे, परमेश्वर ज्ञानबा चौधरी, शंकर दत्तराव काळे, मंगेश नारायण काटे, मोहम्मद युसूफ मोहम्मद ख्वाजा, अभिषेक गजानन हलगे, सर्वेश कैलास धूत, नागनाथ रामराव राऊत, अमर इंगोले, मारोती भुताडे यांनी कट रचून टाकल्याचे समोर आले. या सर्व आरोपींना पोलिसांना अटक केली असून, त्यांच्याकडे विचारपूस केली असता ‘फ्लिपकार्ट’ कंपनीचे पार्सल वाहनचालक नागनाथ राऊत व मारोती भुताडे यांच्या सांगण्यावरून व रिसोड येथील फ्लिपकार्ट कंपनीचा तत्कालीन व्यवस्थापक सर्वेश धूत यांच्या नियोजनाप्रमाणे हा गुन्हा केल्याची कबुली दिली.