हिंगोली : बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाच्या वरच्या भागात सुरू असलेल्या पावसाचे पाणी येत असल्याने येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी (१५ऑगस्ट) रोजी सकाळी १० पासून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय धरण प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
आजघडीला येलदरी धरणाची पाणीपातळी ४६१.१२० मीटर असून, पाणीसाठा ९१.८५ टक्के इतका झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चालू असल्याने पाणी येत आहे. येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत असल्याने साधारणतः २०० क्युसेकने पाणी एका विद्युत जनित्राद्वारे पूर्णा नदीपात्रात सोडले जाईल. नदी काठच्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
याचप्रमाणे जिल्ह्याच्या सीमा भागातील पैनगंगा नदीवरील इसापूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने सुरुवातीला २ व १४ क्रमांकाचे दोन दरवाजे २० सेंटीमीटरने उघडून पेनगंगा नदी पात्रात एक हजार ३३९ प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. आता परत ईसापूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने ३ दरवाजे ५० सेंटीमीटरने उचलण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाआहे. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाण्याची पातळी ४४०.४३ मीटर असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा ९४.३८ टक्के झाला आहे.
गेल्या १२ तासांत धरणात ६.०९८६ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणाचे ३ दरवाजे ५० सेंमीने उचलून ४ हजार ९१२ क्युसेकच्या विसर्गाने धरणातील अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे एकीकडे धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाणी साठा वाढत आहे. परंतु, जिल्ह्यातील लहान प्रकल्प, तलाव अजूनही तहानलेलेच आहेत.