रत्नागिरी : इतिहासातील पटखेळ म्हणून ओळखल्या जाणा-या ‘मंकला’ या खेळाचे काही अवशेष हाती लागल्याने ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्याचा प्राचीन इतिहास पुन्हा जागा झाला आहे. यापरिसरात प्राचीन काळातील पटखेळाचे अवशेष इतिहास अभ्यासक स्नेहल बने यांनी शोधल्याने प्राचीन खेळाची माहिती समोर आली आहे.

मनोरंजनाचा भाग असलेल्या मंकला’ या खेळाचे अवशेष यापूर्वी देखील आढळून आले होते. मात्र नव्याने या पटखेळाचे अवशेष सापडल्याने रत्नदुर्गच्या इतिहासातील मनोरंजनाच्या पद्धतींवर प्रकाश पडला आहे. या खेळाचे पुरातन अवशेष किल्ल्याच्या तीन प्रमुख ठिकाणी शोधण्यात आले आहेत. यामध्ये महादरवाजा, दीपगृह आणि भगवती मंदिराच्या जवळच्या हनुमान मंदिर परिसराचा समावेश आहे. या भागात १२ खडे उभ्या आणि १२ खडे आडव्या रांगेत असलेले २४ खड्यांचा एक मोठा ‘मंकला’ आणि १२ खड्यांचे आणखी दोन ‘मंकला’ असे तीन पट याठिकाणी आढळून आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत खेळ जाणारा हा ‘मंकला’ खेळ ‘बाव’ नावाने प्रसिद्ध आहे. या खेळाचा इतिहास सुमारे ३५०० वर्षांपूर्वीचा आहे. याचे इजिप्तमधील कर्नाक येथील उत्खननात प्राचीन अवशेष सापडले आहेत. आफ्रिकेतून लोकांचे स्थलांतर आणि व्यापारामुळे हा खेळ मध्य आणि दक्षिण आशियात पसरल्याचे सांगितले जाते.

भारतामधील विविध राज्यांमध्ये या खेळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. दक्षिण भारतात ‘अलीगुली माने’, ‘चिने माने’, ‘हरलुमाने’, ‘पिचकी माने’, ‘गोटू गुणी’, ‘पलंगुजी’ तर महाराष्ट्र आणि हिंदी भाषिक प्रदेशात ‘सातगोल’, ‘सातगोटी’,’गोगलगाय’ आणि कोकणात ‘गुरूपल्याण’ या नावांनी हा खेळ आजही काही ठिकाणी खेळला जातो. रायगडसह कोकणच्या इतर भागांमध्येही या खेळाचे जुने अवशेष यापूर्वी सापडले असल्याचे सांगण्यात येते.

मकला’ खेळण्यासाठी आयताकृती लाकडी फळीवर समोरासमोर प्रत्येकी पाच, सहा किंवा सात खड्डे कोरलेले असतात. खेळायला सुरुवात करताना प्रत्येक खड्यात पाच कवड्या ठेवल्या जातात. पूर्वी काही संपन्न घराण्यांमध्ये हा खेळ धातूमध्ये आकर्षक नक्षीकाम करून बनवलेला असे. या खेळात सोंगट्या म्हणून कवड्यांव्यतिरिक्त रंगीत खडे, धान्य, बिया आणि काहीवेळा मौल्यवान रत्नांचाही वापर केला जात होता. मात्र आता रत्नदूर्ग किल्ल्यावर मिळालेल्या अवशेषामुळे मंकला हा खेळ पुन्हा इतिहास काळातील कुतुहलाचा विषय म्हणून हाताळला जात आहे. तसेच नवीन पिढीला याची माहीती मिळणे सोपे झाले आहे..

भारतातील अनेक प्राचीन लेण्यांमध्ये विविध प्रकारचे बैठे खेळ कोरलेले आढळून आले आहेत. त्यापैकी ‘मंकला’ खेळाच्या अवशेषांची संख्या अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेत तर हा खेळ राष्ट्रीय बैठे खेळ म्हणून ओळखला जातो. ‘वारी’, ‘मॅकोन’, ‘सोरो’ यांसारखी काही परदेशी नावेही जगभरात या खेळासाठी प्रसिद्ध आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यावर ‘मंकला’चे पुन्हा अवशेष मिळणे हे या ऐतिहासिक स्थळाच्या भूतकाळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास साठी निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल आहे.- स्नेहल बने, इतिहास अभ्यासक.