शेवगाव तालुक्यात गुंडाकडून पोलीस कर्मचाऱ्याची झालेली हत्या ताजी असतानाच श्रीरामपूर येथे शुक्रवारी नामचीन गुंडाने भरदिवसा रस्त्यावरच पोलीस उपनिरीक्षकाला कमरेच्या पट्टय़ाने मारहाण केली. येथील नगरपालिकेसमोरच ही घटना घडली. मोठा जमाव जमूनही सर्वानीच बघ्याची भूमिका घेतल्याने एवढे करूनही हा गुंड नंतर पळून जाण्यात यशस्वी झाला.
शहरात दोन दिवसांपासून पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. तरीदेखील सोन्या बेग गुंड हा शहरात राजरोसपणे िहडत होता. त्याच्या मागावर पोलीस होते. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता पोलीस उपनिरीक्षक पाटील हे पोलीस ठाण्याकडे येत असताना नगरपालिकेनजीक सोन्या हा दुचाकीवर चहाच्या दुकानासमोर उभा होता. पाटील यांनी त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली व पोलीस ठाण्यात चल असे सांगितले. त्या वेळी दोघांमध्ये झटापट झाली. दोघेही खाली पडले. उठताना सोन्याने कमरेचा पट्टा काढून पाटील यांना मारहाण केली. पाटील यांनीही प्रतिकार केला. मात्र सोन्या तोपर्यंत पळून गेला. या वेळी लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. कोणीही या प्रकरणात मध्ये आले नाही. पाटील यांनी सरकारी गणवेश परिधान केलेला नसल्याने ते पोलीस असल्याचे अनेकांच्या लक्षातच आले नाही. उलट दोन गुंडांमध्येच हाणामारी सुरू असल्याने मध्ये कोणी पडले नाही. आरोपी सोन्या बेग याच्याविरुद्ध जिल्ह्यातील वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांत सुमारे १७ गुन्हे दाखल आहेत. महिलांच्या गळय़ातील दागिन्यांची धूम स्टाईलने चोरी, घरफोडय़ा, रस्तालूट, लैंगिक अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. संगमनेर पोलिसांना तो हवा आहे.
चोऱ्या व बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील खतरनाक आरोपी सोन्या बेगला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी तालुका उपप्रमुखपदी नुकतेच नेमले आहे. सत्तारूढ पक्षाच्या आश्रयाला तो गेल्याने त्याच्यावर कारवाई करताना पोलिसांना अडचणी येत आहेत. त्याच्या नियुक्तीचे फलक लावण्याची परवानगी शिवसेनेने मागितली होती. त्याला पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी नकार दिला. त्यानंतर पोलीस व शिवसेनेत वाद उद्भवले. शुक्रवारी हा हल्ला झाल्यानंतर सेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्याशी उपनिरीक्षक पाटील यांची मोबाइलवरून वादावादी झाली. देवकर यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर देवकर, उपजिल्हाप्रमुख महेश क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्यात येऊन पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेनंतर पाटील यांनी शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा शहर बंद ठेवण्यात येईल, असा इशारा देवकर यांनी दिला आहे. मात्र निरीक्षक सपकाळे यांनी या घटनेचा इन्कार केला आहे. दरम्यान, बेग टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hooligan beaten psi in shrirampur
First published on: 21-02-2015 at 03:30 IST