कोल्हापूर : खाजगी सावकारीला कंटाळून येथील एका हॉटेल व्यावसायिकांने आत्महत्या केली. शैलेश शिवाजी जठार (वय ३३) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात पत्नीने फिर्याद दिली आहे.
पत्नी ज्योती जठार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पती शैलेश जठार यांचा हॉटेल व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी संजय कटके याच्याकडून ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र त्याचे अडीच लाख रुपये झाले असल्याचे सांगत त्याच्या वसुलीसाठी कटके धमक्या देत होता. सासू सासरे यांनी पतीला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. तरीही ते कर्जाच्या बोजामुळे चिंतेत होते.
आज शैलेश यांनी घराच्या टेरेसवर आत्महत्या केली. त्यांच्याकडे दोन चिठ्ठ्या मिळाल्या असून त्यामध्ये संजय कटके यांच्या खाजगी सावकारीमुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.