वेगाने बदलणारे जग आपल्या शिक्षण व्यवस्थेकडे आदराने पाहात असताना आपली शिक्षण व्यवस्था निकृष्ट आहे, असे आपण कसे म्हणू शकतो, असा सवाल ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ आणि प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मश्री विजय भटकर यांनी केला.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्या शाळेच्या नवती महोत्सवाचा शुभारंभ कार्यक्रमात भटकर बोलत होते. यावेळी डॉ. अलका वाडकर, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, नगराध्यक्षा नीलिमाताई खरात, संस्थेचे सचिव रवींद्र देशपांडे, संचालक शिवाजी फेगसे, पोपटलाल ओसवाल, पी व्ही एस शास्त्री आदी उपस्थित होते.
प्रारंभी संचालक पोपटलाल ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भटकर पुढे म्हणाले, १८९० मध्ये आपल्याकडे फक्त सहा टक्के साक्षरता होती. आजही आपल्याकडे जगाच्या पाठीवर अशिक्षितांची संख्या जास्त आहे, तरीही आपण शिक्षणात एक आमूलाग्र क्रांती केली आहे हे मान्य करावेच लागेल. सद्या परीक्षांचे निकाल लागत आहेत. मुले-मुली मोठय़ा टक्केवारीने उत्तीर्ण होत असताना आपले शिक्षण निकृष्ट दर्जाच आहे, असे आपण कसे म्हणू शकतो. संसदेच्या सभागृहात भाषण करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेचे शालेय शिक्षण भारतासारखे असायला पाहिजे असे म्हणतात. या गोष्टीचा आपण अभिमान बाळगत नाही हे दु:खच आहे. आपले शिक्षण हे परीक्षाप्रधान झालेले आहे. हे आपल्याला बदलायचे आहे.  आपल्याला सर्जनशीलता आणायची आहे. आता भारताला आविष्कार प्रधान(संशोधन)विद्यापीठ स्थापन करायचे आहे. मुलांना किती टक्के मार्क मिळाले हे महत्त्वाचे राहणार नाही तर त्यात किती क्रियेटीव्हीटी आहे हे महत्त्वाच ठरणार आहे. आपलयाकडील आयआयटी पास होणारा मुलगा अमेरिकेची एमआयटी पास होऊ शकतो, पण जगातील मुलगा आयआयटी पास होऊ शकत नाही, इतके हे अवघड आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत गैरप्रकार होतात म्हणून शिक्षण निकृष्ट दर्जाचे आहे, असे म्हणता येणार नाही.
आता शिक्षणाचे आयाम बदलले आहेत. मी कशाने शिकतो हे महत्त्वाचे ठरणार नसून घरी बसूनही तुम्ही आता केजी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण मिळवू शकता. त्यासाठी संगणकीय आयुधे महत्त्वाची ठरत आहेत. सद्या स्त्रिया शिक्षणातून पुढे येत आहेत. यातूनच पुन्हा मातृसंस्कृती  उदयाला येणार आहे आणि आपल्या नियतीचीही अशीच रचना आहे. आता वेगाने बदलणा-या जगात २०२० मध्ये भारत महासत्ता तर होणारच आहे. त्याही पुढे जाऊन आपल्याला आता विश्वगुरू व्हायचे आहे, त्यासाठीचा अभ्यासक्रम आपण तयार करत आहोत. हा अभ्यासक्रम तम्हाला कुठेही हुडकण्याची गरज नाही तर तो आपल्या प्राचीन शास्त्र व संस्कृतीत दडलेलाच आहे असेही भटकर यांनी सांगितले.
यावेळी मानसशास्त्राच्या अभ्यासक डॉ अलका वाडकर म्हणाल्या, आयुष्यातील परिस्थिती बदलण्याचे बळ शिक्षणातून मिळायला हवे. शिक्षण ही एक औपचारिक गोष्ट असता कामा नये. महिला कायम दुस-यांसाठीच जगतात. पण त्यात कौटुंबिक न्यायाची व अधिकाराची भूमिकाही असायला हवी. नवती महोत्सवाच्या अध्यक्षा व विश्वकोशाच्या अध्यक्षा विजया वाड  यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी आ. मकरंद पाटील आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाला वाईकर नागरिक, सभासद, आजी-माजी विदयार्थिनी मोठय़ा संख्यने उपस्थित होत्या.
 
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How bad education
First published on: 24-06-2014 at 03:00 IST