रामराज्य म्हणजे सुशासन, पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, कर्मभाव, प्रयत्नवाद म्हणजे रामराज्य. रामराज्य म्हणजे की पंतप्रधान मोदींनी जी संकल्पना मांडली आहे ती दहशतवाद मुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, घराणेशाही मुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या रामराज्याच्या संकल्पना आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात म्हटलं आहे. तसंच आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली आहे. ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. प्रभू रामाचं अस्तित्व नाकारणारे लोक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कसे काय जातील? असा सवाल त्यांनी केला आहे.

प्रभू श्रीरामांना ऋषींनी का बोलवून घेतलं होतं? तर राक्षस हे त्या काळात सज्जन शक्तींना त्रास देत होते. ऋषी मुनी जे यज्ञ किंवा कर्मकांड करत होते त्यात राक्षस विघ्न आणायचे. त्यावेळी दशरथाकडे ऋषी-मुनींनी केली की प्रभू रामाला पाठवा आणि राक्षसांपासून आम्हाला मुक्ती द्या. याचाच अर्थ दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात ही प्रभू श्रीरामांनी केली. राक्षसांचा नायनाट केला आणि सज्जनशक्तींना त्रास देणाऱ्यांना वाचवलं. आज या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्जन शक्ती आहेत, दहशतवाद माजवत आहेत त्यांचा नायनाट करत आहेत. आवश्यकता पडल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकही केले जातात आणि ३७० कलम हटवून दुर्जन शक्तींना सांगितलं जातं की भारताचे तुकडे तुम्हाला करु देणार नाही. रामराज्याची संकल्पनेवरच देशाचा कारभार सुरु आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ज्यांच्या मनात राम आहे, ज्यांच्या कामात राम आहे त्यांच्याच हातून चांगलं काम होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच करुन दाखवलं. कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता गरीब कल्याणाचं काम केलं. राजीव गांधी म्हणायचे मी एक रुपया दिल्लीहून पाठवला की १५ पैसेच गरीबाला मिळतात बाकीचे पैसे व्यवस्था खाऊन टाकते. मात्र मोदींनी अशी व्यवस्था उभी केली जी गरीबाच्या खात्यात संपूर्ण एक रुपया जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवभारताची नव अस्मिता राम मंदिराच्या निमित्ताने अयोध्येत प्रस्थापित होते आहे. पण काही लोक या कार्यक्रमाला जाणार नाहीत. ते कसे काय जातील? काही लोक प्रश्न विचारतात मोदींनी काय केलं? राम मंदिराचा निकाल तर न्यायालयाने दिला. मी त्यांना प्रश्न विचारु इच्छितो २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं. राम काल्पनिक आहेत. रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला याचा कुठला पुरावा नाही. त्यामुळे यांनी पूर्ण व्यवस्था उभी केली होती की सर्वोच्च न्यायालयाने आपला रामजन्मभूमीवरचा अधिकार संपवावा आणि सांगावं की इथे मंदिर आहे याचा पुरावा नाही, रामलल्ला जन्माला आले हा पुरावा नाही त्यामुळे मंदिर बांधलं जाऊ शकत नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देत सांगितलं की रामसेतू ही काल्पनिक संकल्पना आहे. त्यामुळे रामसेतू तोडून तिथून जहाजं जाण्यासाठी मार्ग तयार करा. अशा पद्धतीने रामाला नाकारणारे हे लोक आहेत. त्यामुळे मोदींच्या राज्यात सरकारने दृढतेने सांगितलं की रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या आहेत तीच रामजन्मभूमी आहे. आम्हाला तिथेच मंदिर सापडलं आहे, आम्हाला तिथेच ६४ खांब मिळाले. त्याच ठिकाणी मूर्तीही सापडल्या आहेत. त्याच ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर आम्ही बनवणार हे सांगणारे मोदीजी होते आणि राम मंदिर समिती होती. त्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहोत. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला बोल केला.