राज्याती करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे, रूग्णसंख्येत दररोज मोठी वाढ सुरू आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा अद्यापही कायम असल्याने, १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. यावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

“देशात कोविडशी लढण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. कुठलेही नियोजन न करता घोषणा केल्या जातात. राज्यांना लस पोहचवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. उद्यापासून लसीकरणाची घोषणा केली आहे मात्र लसच नाही, तर लसीकरण होणार कसं ? सरकारला उत्तर द्यावं लागेल.” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

तसेच, “केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली की १ मे पासून राज्य सरकार आपल्या पैशांद्वारे लोकांचं मोफत लसीकरण करू शकते. मात्र देशात लसच उपलब्ध नाही. एक कंपनी आहे सीरम ज्यांची उत्पादन क्षमता आहे परंतु, देशाचे सर्व ऑर्डरच ती पूर्ण करू शकत नसल्याचं दिसत आहे. भारत बायोटेकची उत्पादन क्षमता अतिशय कमी आहे. अन्य कंपन्यांना परवनागी देण्याचं काम होत नाही. अशी सगळी परिस्थती असतानाही जगभरातील ७० देशांना लस वाटण्याचं काम मोदींनी केलं. आम्हाला वाटतं कोविडबाबत नियोजनाचा अभाव आहे. घोषण करण्या अगोदर त्यावर चर्चा केली जात नाही, तयारी केली जात नाही. उद्यापासून लसीकरणाची घोषणा केली आहे, लस उपलब्धच नाही तर लसीकरण होणार कसे? याचं मोदी सरकारला उत्तर द्यावं लागेल.” असं मलिक यांनी यावेळी म्हटलं आहे.

लस मोफत, पण विलंबाने!

तर, राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मात्र, लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र दिनापासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट के ले. लशींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू करण्यात येणार असून, सहव्याधी असलेल्यांना प्राधान्य वा वयोमानानुसार टप्पे तयार करण्याची सरकारची योजना आहे.

“महाराष्ट्रात १ मेपासून लसीकरण सुरू होऊ शकेल, पण…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

दरम्यान, आज(शुक्रवार) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ मे पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. “१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनाच संबंधित केंद्रावर जाता येईल”, असं ते म्हणाले.