मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये शिकणारी निष्का होसंगडीला दुर्धर आजाराने ग्रासले, आठ वर्षांची असताना तिच्या उजव्या हाताची हालचालही बंद झाली, तिची वाचाही गेली… पण निष्का खचली नाही, तिने जिद्दीच्या आधारे निष्काने शिक्षण सुरुच ठेवले, आधी दहावी आणि यंदा बारावीत निष्काने यश मिळवले आहे… यंदा आयपॅडवर बारावीची परीक्षा देत तिने तब्बल ७३ टक्के मिळवले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला असून यंदा पहिल्यांदाच २२ प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी होते. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२. ६० टक्के इतका लागला आहे. मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निष्काने बारावीच्या परीक्षेत ७३ टक्के मिळवले आहेत. निष्का ही दिव्यांग असून तिने आयपॅडवर बारावीची परीक्षा दिली होती.

निष्काला डिस्टोनियाचा आजाराने ग्रासले असून या आजारामुळे आठ वर्षांची असताना तिच्या उजव्या हाताची हालचाल बंद झाली. तसेच तिची वाचाही गेली. निष्काला डिस्टोनियाचा आजाराने ग्रासले असून या आजारामुळे आठ वर्षांची असताना तिच्या उजव्या हाताची हालचाल बंद झाली. तसेच तिची वाचाही गेली. एनआयओएस बोर्डामार्फत दहावीची परीक्षा दिल्यानंतर निष्काने अकरावीत सोफिया कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजच्या उप-प्राचार्य सिस्टर अॅनी पीटर यांनी फेब्रुवारी महिन्यात टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले होती की, निष्का अभ्यासात खूप हुशार आहे. निष्काला शक्य तितक्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

निष्काच्या पालकांनी बोर्डाशी संपर्क साधून तिला आयपॅडवर बारावीची परीक्षा देण्याची मुभा द्यावी, अशी विनंती केली होती. बोर्डानी ही विनंती मान्य करत तिला आयपॅड वापरण्याची मुभा दिली. निष्काने डाव्या हाताने आयपॅडवर उत्तर टाइप केले आणि मदतनीस ते उत्तर लिहित होता. निष्काने परीक्षेत तब्बल ७३ टक्के मिळवल्याची माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली. निष्काच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय आणि सोफिया कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण आहे.