scorecardresearch

खळबळजनक : नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यामध्ये आढळले मानवी अवयव

एका बकेटमध्ये आठ कान आढळून आले असल्याची देखील माहिती समोर

नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यामध्ये मानवी अवयव आणि सांगाडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल (रविवार) रात्री मुंबई नाका पोलीस ठाण्याच्याच पाठीमागील सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित व साठवणूक केल्याचे आढळून आल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबई नाका पोलीस स्टेशनलगत असलेल्या हरी विहार बिल्डिंगच्या बंद पडलेल्या गाळ्यामध्ये हे अवयव सापडले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये किंवा मृतदेह परीक्षणासाठीच्या प्रयोगशाळेत ठेवल्या जाणाऱ्या अवस्थेत आढळले आहेत. या गाळ्यांत वेगवेगळ्या बादल्यांमध्ये केमिकल परीक्षण व प्रक्रिया करून ठेवलेले मानवी डोकं, हात, कान व अन्य शारिरीक अवयव सापडले आहेत. 

दरम्यान, गाळे मालकाने हे गाळे पंधरा वर्षांपासून उघडलेलेच नाहीत. ते बंदच होते. याबद्दल मला काहीच माहित नाही. अशी माहिती पोलिसांना दिली आहे. 

हरी विहार सोसायटी मध्ये काही गाड्यांचे बॅटरी चोरीला गेल्यावर सोसायटीचे चेरमान चोरीला गेलेल्या बॅटरींचा शोध घेत असताना त्यांना सोसायटीच्या परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्याच्या आत हे अवयव आढळून आले. त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली आणि हा सगळा प्रकार समोर आला.

”मुंबईनाका पोलीस स्टेशन, द्वारका पोलीस चौकी यांच्या हद्दीतील हरी विहार सोसायटी या ठिकाणी शुभांगी शिंदे यांच्या मालकीच्या या ठिकाणी दोन गाळे आहेत. त्यापैकी एक गाळा अनेक वर्षांपासून बंद होता. येथील नागिरकांना दोन दिवसांपासून मृतदेह कुजल्यासारखा वास येत होता. शिवाय परिसरातील वाहनांच्या बॅटरी देखील चोरीस जात होत्या. त्यामुळे येथील नागरिकांनी थोडी शोधाशोध केली. तेव्हा एका गाळ्याचं शटर तुटलेलं आढळून आलं, त्यानंतर जेव्हा ते पूर्णपणे उघडण्यात आलं तेव्हा त्यांना आतमध्ये काही मानवी अवयव आढळून आले.” अशी माहिती पोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी माध्यमांना दिली.

तसेच, ”प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते की शुभांगी शिंदे यांची मुले वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यामुळे ते शिक्षण घेत असताना त्यांनी किंवा त्यांच्या मित्रांनी त्यांच्या प्रोजक्ट संदर्भात किंवा अभ्यासाठी मानवी अवयव येथे ठेवले असू शकतात. कारण ज्या अवस्थेत हे अवयव सापडेल ते पाहून या क्षेत्रातील तज्ज्ञांने ते ठेवले असल्याचे दिसून येते. गाळ्यामध्ये आढळून आलेल्या बकेटमध्ये आठ कान आढळून आले आहेत. यावरून कदाचित त्यांनी त्याच्या अभ्यासाठी साठी हे ठेवले असण्याची शक्यता दाट आहे. तरी देखील मुंबईनाका पोलीस स्टेशन, नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे आणि नक्कीच अंतिम निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचू. तिथे जे कंटनेर आढळले आहे त्यावर २००५ वर्षाचा उल्लेख दिसून येत आहे. त्यानुसार साधारण १६-१७ वर्षांपूर्वी ते ठेवल्याचं दिसून येत आहे. शिवाय, संबंधित गाळे अनेक वर्षांपासून उघडण्यात देखील आलेले नाहीत.” असंही त्या म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Human organs found in a shop closed for many years in nashik msr

ताज्या बातम्या