Dussehra 2025 Ravan Dahan: वाईटवार चांगल्याचा, असत्यावर सत्याचा आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून विजयादशमी या सणाकडे पाहिले जाते. तसेच यादिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयोत्सव साजरा केला जातो. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एकेठिकाणी रावणाऐवजी त्याची बहीण शूर्पणखा हीचे दहन करण्यात आले आहे. दहन करण्यापूर्वी आरती गाण्यात आली. तसेच विधीवत हा कार्यक्रम पार पडला. पत्नी पीडित आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याची निकड का आहे? यावर भाष्य केले.

विजयादशमीच्या पारंपरिक सणानिमित्त रावण दहनाप्रमाणेच आज पत्नी पीडित पुरुष आश्रमात शूर्पणखा वाईट वृत्ती दहन कार्यक्रम साजरा करण्यात आला. रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु महिलांमधील वाईट वृत्ती, समाजघातकी प्रवृत्ती यांचाही नाश व्हावा, या उद्देशाने शूर्पणखा वृत्ती दहनाचा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे संस्थेचे पदाधिकारी अॅड. भारत फुलारे यांनी म्हटले.

रावण महापंडित महापुरूष

फुलारे पुढे म्हणाले की, रावणाचे वर्षानुवर्ष दहन केले जात आहे. रावण हा महापंडित महापुरूष होता. इतकी वर्ष रावणाच्या पुतळ्याचे दहन केल्यामुळे पुरूषांमधील वाईट वृती जळून भस्मसात झाल्या आहेत. वाईट वृत्ती कमी झाल्या आहेत. पण त्याची बहीण शूर्पणखा (म्हणजे इतर महिला) सुधरली नाही. तिच्यातील वाईट वृत्ती वाढत चालल्या आहेत. महिलांमधील वाईट वृत्तीही जळून खाक व्हाव्यात यासाठी आम्ही शूर्पणखा वाईट वृत्तीचे दहन करत आहोत.

फुलारे यांनी म्हटले की, पुरुषांवरील अन्याय, खोट्या केसेस, पोटगीचे ओझे, तसेच महिलांकडून कायद्याचा होणारा दुरुपयोग यामुळे अनेक पुरुष आत्महत्या करत आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार पुरुषांच्या आत्महत्यांचं प्रमाण महिलांपेक्षा तिप्पट असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत पुरुषांचेही सबलीकरण होणे आवश्यक असून पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग, घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात लाय डिटेक्टर सुविधा असावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महिला आयोगाप्रमाणे पुरूष आयोग असावा. महिला दक्षता समिती आहे, तशी पुरूष दक्षता समिती हवी. पुरूष तक्रार निवारण केंद्रही हवे. पुरूषावर अन्याय झाल्यास, त्याला ते कुठेतरी जाऊन सांगता यायला हवे. आम्ही अनेक वर्षांपासून यावर मागण्या करत आहोत. पण शासन काहीही हालचाल करत नाही. शासनाला अजून किती पुरूषांच्या आत्महत्या हव्यात, हे कळायला मार्ग नाही, अशीही खंत फुलारे यांनी व्यक्त केली.

Shurpanakha dahan
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत शूर्पणखेची भूमिका अभिनेत्री रेणु धारीवाला यांनी साकारली आहे. रेणु यांनी वयाच्या २२व्या वर्षी ही भूमिका केली होती.

विवाहसंस्था टिकवायची असेल तर लिंगभेद संपवावा लागेल. पुरूष आणि महिलांसाठी समान कायदे असायला हवेत, असेही ते म्हणाले.