विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना भाजपा व शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्यांवर टीका केली आहे. काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण पक्ष सोडून गेले आहेत, पळून जाण्यात काय अर्थ? संकट काळात काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर इथे झाला यावेळी ते बोलत होते. संगमनेर तालुक्यातील निर्झणेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, आमदार डॉ. सुधीर तांबे यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रसंगी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी काँग्रेसची खिंड बाजीप्रभू देशपांडेंसारखी लढवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य अडचणीत असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी पळून न जाता खिंड लढवली होती. आता काँग्रेसपक्ष अडचणीत असताना देखील मी असंच काम करत आहे. संकट काळात काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे.

इतिहास तोच घडवतो जो सातत्याने लढत राहतो. पळून जाण्यात काय अर्थ? घर पेटलं तर तुम्ही पळून जाणे योग्य नाही, असा टोलाही थोरात यांनी यावेळी पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना लगावला.  सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलणारे काही नेते महाराष्ट्रात आहेत. आम्ही असे प‌ळपुटे नाहीत. पक्षासोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत. पक्षाध्यक्ष कुठे दिसत नाही, असे विचारणारे साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते होते का? कारण विरोध करताना ते कुठे दिसलेच नाहीत. राज्याच्या तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी काम केली नाहीत. त्यामुळं आज आम्हाला धावपळ करण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही थोरातांनी विखेंवर यावेळी केली. याचबरोबर या निवडणुकीत काँग्रेस नव्या जोमाने उभारी घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am a betajiprabhu for the congress in times of crisis msr
First published on: 08-10-2019 at 19:18 IST