मनोज जरांगे पाटील रोज माझ्याविषयी काहीही बोलत असतात. मी त्यांच्या १५-२० सभा झाल्यानंतर जर त्यांच्याविषयी काही बोललो की लोक माझ्याविरोधात तुटून पडतात. महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्यासाठी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील रोज प्रयत्न करत आहेत असा आरोप होतो. पण तो रोज बोलतो आहे, मी पंधरा दिवसांतून एकदा उत्तर देतो आहे. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मी बेकायदा बंदूक घेऊन फिरत नाही
छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मी काही जाळपोळ करत नाही, मी काही बेकायदा पिस्तूल घेऊन गुंडांना बरोबर घेऊन फिरत नाही. ज्या गुंडांनी जाळपोळ केली त्यांनी सोडा म्हणून सांगत नाही” असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.लोकशाही मार्गाने उत्तर देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. त्यांनी द्यावं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र, कोर्टात जाऊत ते थांबवता येतं. मनोज जरांगे पाटील यांचा जो अभ्यास आहे त्याबद्दल मी न बोललेलं बरं.
मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही
शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मागच्या दाराने जे लोक येत आहेत, जे काही प्रकार चालले आहेत त्याला माझी हरकत आहे. मनोज जरांगे पाटील माझा सातत्याने एकेरी उल्लेख करत आहेत. मी शांत राहिलो तरीही माझ्या संयमाला मर्यादा आहेत. त्यामुळे उत्तर ज्यावेळी द्यायचं तेव्हा मी देणार असं भुजबळ म्हणाले. बॅकडोअर एंट्री जर कुणाला दिली तर ते सगळं नंतर रद्द होईल असंही छगन भुजबळ म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हा काय महाराष्ट्राचा नेता नाही झाला
तो (मनोज जरांगे पाटील) काही महाराष्ट्राचा नेता झाला नाही, जो सगळ्यांना आदेश देईल. मनोज जरांगेंना माझं सांगणं आहे हे जे तो म्हणतोय ना तुम्ही सगळं खाताय त्याचा जरा अभ्यास कर. कशी मांडणी आहे ते जरा बघ. अभ्यास केल्यानंतर प्रश्न विचार आम्ही तुला उत्तर देऊ. माहीत नसताना काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची हेच चाललं आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिलं आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे सगळ्या पक्षांची आहे. याविषयी इतरांनीही व्यक्त झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, आम्ही विरोध केलेलाच नाही. मात्र मागच्या दाराने येऊन कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसींमध्ये घुसू नका असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.