२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही सुट्टी घेतली नव्हती, अशी माहिती माहिती अधिकारातून पुढे आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ५६ वर्षे सुट्टी घेतली नसल्याचं म्हटलं आहे. बारामतीच्या उंडवडी सुपेमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

शरद पवार गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात काँग्रेसमधून झाली. तर, १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राजकारणात आल्यानंतर त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही, असं शरद पवार म्हणाले. जनतेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, तुम्ही लोकांनी मला आमदार केल, मंत्री केलं. चारवेळा मुख्यमंत्री केलं. मात्र तुम्ही लोकांनी मला ५६ वर्ष एकही सुट्टी दिली नाही. शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो मात्र आपण मला सुट्टी देत नाहीत. हे वागणं काही बरं आहे का?

“इतकी वर्षे लोकांनी साथ दिली, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की शेवटपर्यंत विकासाची कामे करत राहायची. गावात, जिल्ह्यात आणि दिल्लीत तुम्हा लोकांना पुढे ठेवूनच काम करायंच, हे सूत्र ठेवून काम करतोय. तुम्हा सर्वांची साथ आहे याबाबत कृतज्ञता व्यक्त करतो”, असं म्हणत शरद पवारांनी जनतेचे आभार मानले.

हेही वाचा >> “सुप्रिया सुळे सारखं दादा-दादा करायच्या, तेव्हा मला राग यायचा”, जितेंद्र आव्हाडांची उघड नाराजी; म्हणाले…

कोणी न स्वीकारलेलं कृषी खातं मी स्वीकारलं

“मी देशाचा कृषिमंत्री झाल्यावर माझ्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी देशात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र जो देश कृषिप्रधान देश आहे, त्या देशात अन्न धान्याची आयात करणे मला पटले नाही. माझ्या काळात मी ७१ हजार कोटींची कर्ज माफी केली. व्याज दरात शेतकऱ्यांना सुट दिली. कोणी न स्वीकारलेलं कृषी खातं मी स्वीकारलं. शेतीत अनेक बदल केल्याने आज जगात १८ देशांना आपण धान्य निर्यात करतो. शेतकऱ्यांमुळे ही बाब घडून आली”, असंही शरद पवार म्हणाले.