राहाता : दोघी जुळ्या बहिणी. एकसारख्याच दिसणाऱ्या. ४२ वर्षीय या जुळ्या बहिणींच्या मेंदूमध्ये आढळलेली गाठ देखील एकाच ठिकाणी, एकाच आकाराची आढळली. वैद्यकीय तपासणीत ‘ब्रेन ट्युमर’चे निदान झाले. या दोन्ही बहिणींच्या मेंदूतील या गाठींवर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या दोन्ही रुग्णांची तब्येत सध्या पूर्णपणे स्वस्थ आहे.

शेगाव (जि. बुलडाणा) तालुक्यातील नागझरी गावच्या सुनीता साबे आणि दुर्गा उगले अशी या दोन बहिणींची नावे आहेत. दुर्गा उगले यांना दीर्घकाळ डोकेदुखीचा त्रास असल्यामुळे त्यांनी आठ महिन्यांपूर्वी साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. मुकुंद चौधरी यांच्याकडे तपासणी केली. त्यांच्या तपासणीमध्ये डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये गाठ आढळली. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

पुढील तपासणीच्या वेळी त्यांची जुळी बहीण सुनीता साबे यांनीही डोकेदुखीची तक्रार मांडली. त्यांचीही ‘एमआरआय’ तपासणी केल्यावर त्यांच्याही मेंदूत त्याच ठिकाणी व समान आकाराची गाठ आढळल्याने वैद्यकीय पथक अचंबित झाले.

दोन्ही बहिणींच्या गाठीचे तुकडे सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यावर त्या पूर्णपणे समान स्वरूपाच्या असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. मुकुंद चौधरी यांनी आधुनिक तंत्रज्ञान व ‘न्युरो मायक्रोस्कोप’च्या साहाय्याने या दोन्ही बहिणींच्या मेंदूतील गाठींच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या असून, दोन्ही रुग्ण सध्या पूर्णपणे स्वस्थ आहेत.

या दोन्ही शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेसाठी मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. मुकुंद चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे, डॉ. निहार जोशी, तसेच शस्त्रक्रिया विभागातील पथकाचे विशेष योगदान राहिले. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी श्री साईबाबा संस्थानचे मनःपूर्वक आभार मानले.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, उपमुख्य अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक, प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी या यशस्वी कार्याबद्दल वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

दुर्मीळ शस्त्रक्रिया

जुळ्या बहिणींमध्ये एकसारखा आजार दिसणे सामान्य असले, तरी एकाच जागी, एकाच बाजूस, अगदी एकसारखा आकार आणि स्वरूप असणे, तसेच एकाच मेंदूविकार तज्ज्ञांकडून यशस्वी शस्त्रक्रिया होणे हे अतिशय दुर्मीळ आहे. वैद्यकशास्त्रातील अत्यंत दुर्मीळ ठरावा, असा अद्भुत योगायोग आहे. या दोन्ही बहिणींवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचे शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. मुकुंद चौधरी यांनी सांगितले.